अरेरे.. .! अळ्या फस्त करतात तुरीच्या शेंगा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

-परभणी जिल्ह्यात ४७ हजार हेक्टरवर तुरीचा पेरा 
-ढगाळ वातावरणाचा पिकावर परिणाम; शेतकरी चिंतेत
- वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सुचविल्या उपाययोजना 

 

परभणी : जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरणामुळे ऐन भरात असलेल्या तुरीच्या पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाला असून अळ्या शेंगा फस्त करू लागल्या आहेत. मागील महिन्यातही अशाच ढगाळ वातावरणामुळे शेंगा पोखरणाऱ्या अळीचा उद्रेक झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे.

ढगाळ वातावरण तूर पिकासाठी अत्यंत धोकादायक ठरते. अशा वातावरणाचा विपरित परिणाम म्हणून तुरीवर शेंगा आणि पाने खाणाऱ्या अळींची संख्या वाढते. वेळीच उपाययोजना न केल्यास संपूर्ण पीकच फस्त केल्या जाते. त्यामुळे तुरीच्या पिकाची ढगाळ वातावरणात काळजी घ्यावी लागते. यंदा जिल्ह्यात तुरीचा पेरा ४७ हजार हेक्टर एवढा आहे. कापूस, सोयाबीन नंतर सर्वाधिक प्रमाणात तुरीचे पीक घेतल्या जाते. लांबलेल्या पावसामुळे तूर जोमात असतानाचा मागील महिन्याच्या अखरेच्या अठवड्यात तुरीवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला होता. आता पुन्हा अळ्यांना पोषक असे वातावरण तयार झाल्याने अळ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. अळ्या तूर फस्त करत असल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत.

ढगाळ वातावरण किडीसाठी पोषक 
काही ठिकाणी शेंगा या भरल्या आहेत, तर काही भागात उशिरा पेर झाल्याने सध्या शेंगा या फुलांच्या अवस्थेत आणि कोवळ्या आहेत. त्यामुळे अशा तुरीला मोठा धोका आहे. ढगाळ वातावरण किडीसाठी पोषक असल्याने अशा वातावरणात शेंगा खाणाऱ्या अळींची संख्या अनेक पटीने वाढली आहे. या अळ्या थेट शेंगावर हल्ला चढवत आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीन आणि कापसाच्या मोठ्या नुकसानीनंतर केवळ तुरीवर आशा उरल्या आहेत. हे एकच पीक सध्या बऱ्यापैकी असल्याने शेतकरी मोठ्या आशा धरून आहेत. मात्र, चार दिवसांपासून निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे तुरीवर किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. शेंगा पोखरणाऱ्या अळींनी डोके वर काढले आहे. त्यावर वेळीच आळा घालावा लागणार आहे.

अशा करा उपाययोजना
तूर या पिकांमध्ये शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस २५ टक्‍के २० मिली किंवा इमामेक्‍टिन बेन्‍झोएट पाच टक्‍के ४.४ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी, असे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Oops ..! The larvae breed trumpets