सेनगाव तालुक्यात खुलेआम गुटखा विक्री, अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष

विठ्ठल देशमुख
Monday, 8 February 2021

गुटखा सेवणामुळे अनेक तरुण व्यसनाधीन होऊ लागल्यामुळे प्रशासनाने गुटख्यावर बंदी लागू झाली.

सेनगाव ( जिल्हा हिंगोली ) : शहरासह संपूर्ण तालुक्यात गुटखा विक्री खुलेआम सुरु असुन रिसोड व हिंगोली येथून मोठ्या प्रमाणात गुटखा येऊ लागला आहे. याकडे अन्न व औषध आणि पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

गुटखा सेवणामुळे अनेक तरुण व्यसनाधीन होऊ लागल्यामुळे प्रशासनाने गुटख्यावर बंदी लागू झाली. मात्र प्रशासनाच्या आदेशाला बगल देत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री सुरु असल्याचे आढळून आले. मागच्या अनेक दिवसांपासून सेनगाव तालुक्यात गुटखा विक्रेते सक्रिय झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी हिंगोलीच्या पथकाने सेनगाव शहरात एका ठिकाणी किरकोळ गुटखा विक्रेत्यावर छापा टाकून गुटखा जप्त करून गुटखा व्यवसायिकाला ताब्यात घेतले. परंतु सेनगाव शहरातील बड्या गुटखा विक्रेत्यावर अद्याप कुठलाही कार्यवाही झालेली दिसून येत नाही. 

हिंगोली व रिसोड येथून कोट्यावधी रूपयांचा गुटखा सेनगाव शहरात दाखल होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र त्यांच्यावर अद्याप कुठलीच कार्यवाही झालेली दिसून येत नाही. सेनगाव शहरात अनेक बडे गुटखा विक्रेते असुन ते सेनगाव शहरासह तालुक्यात गुटखा विक्रीचा व्यवसाय करुन रोज लाखों रुपयांची उलाढाल करीत असल्याचे आढळून येत आहे. यातील काही गुटखा विक्रेत्यांनी सेनगाव पोलिस ठाणे हद्द सोडून नर्सि नामदेव हद्दीतुन आपला गुटख्याचा व्यवसाय सुरु करून तो सेनगाव तालुक्यात पुरवला जात असल्याची चर्चा होऊ लागली आहे. राज्य शासनाने गुटखा विक्रिवर बंदी घातली असुन सेनगाव शहरासह तालुक्यात मात्र हा अवैध गुटखा व्यवसाय खुलेआम सुरु आहे. या व्यसनाला तरुण युवक बळी पडत असुन त्यांचे आरोग्य धोक्यात आहे.

शिवाय गुटखा सेवन करणाऱ्या व्यक्तीकडून सार्वजनिक ठिकाणी व शासकीय कार्यालय तहसील, पंचायत समितीच्या भिंतीवर पिचकाऱ्या मारून घाण केली जात आहे. नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे अन्न व औषध प्रशासनाने मात्र साफ दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. सेनगाव शहरासह तालुक्यातील गुटखा विक्री कायम बंद करून संबंधित गुटखा व्यावसायिकांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी सर्वसामान्य नागरिकातुन उपस्थित होऊ लागली आहे.

 

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Open sale of gutka in Sengaon taluka, neglect of food and drug administration hingoli news