काकु-पुतण्याचा विवाह वादाच्‍या भोवऱ्यात, कारवाईची मागणी

सुरेश पवार
सोमवार, 20 मे 2019

हट्टा (जि. हिंगोली) : वसमत तालुक्‍यातील नहाद येथे काकु व पुतण्याचा विवाह वादाच्‍या भोवऱ्यात सापडला असून या दोघांवर कारवाई करण्याच्‍या मागणीसाठी हट्टा (ता. वसमत) येथील गावकऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवली. तर दोन तास रास्‍तारोको आंदोलन केले.

हट्टा (जि. हिंगोली) : वसमत तालुक्‍यातील नहाद येथे काकु व पुतण्याचा विवाह वादाच्‍या भोवऱ्यात सापडला असून या दोघांवर कारवाई करण्याच्‍या मागणीसाठी हट्टा (ता. वसमत) येथील गावकऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवली. तर दोन तास रास्‍तारोको आंदोलन केले.

वसमत तालुक्‍यातील नहाद येथील 37 वर्षीय काकूचे अठरा वर्षीय पुतण्यावर प्रेम जडले होते. त्‍यानंतर दोघांनी घर सोडले. काही दिवसापूर्वीच त्‍यांनी हट्टा येथील एका मंदिरामध्ये विनापरवानगी विवाह केला. या विवाहासाठी कोणीही हजर नव्‍हते. दोघांनीही मंदिरात एकमेकांच्‍या गळ्यात हार घालून विवाह पार पाडला. मात्र या प्रकारामुळे मंदिराचे धार्मिक पावित्र्याला धक्‍का पोहोचल्‍याचा आरोप हट्टा येथील गावकऱ्यांनी केला. या दोघांवर कारवाई करण्याची गावकरी व मंदिर संस्‍थानने केली होती. मात्र या प्रकरणात कुठल्‍याही प्रकारची कारवाई न झाल्‍याने आज गावकऱ्यांनी हट्टा बंद पुकारला होता.

यामध्ये संपूर्ण बाजारपेठ सकाळपासूनच बंद होती. त्‍यानंतर गावकऱ्यांनी औंढा ते परभणी मार्गावर हट्टा गावाजवळ रास्‍तरोको सुरु केला. अचानक झालेल्‍या या आंदोलनामुळे पोलिसांची धावपळ झाली. पोलिस उपअधीक्षक सतीश देशमुख, सहाय्यक पोलिस निरीक्षक गुलाब बाचेवाड, उपनिरीक्षक ज्ञानोबा मुलगीर यांच्‍या पथकाने आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी मंदिरामध्ये विनापरवानगी विवाह केल्‍याप्रकरणी वरील दोघांवर कारवाई करावी अशी मागणी केली. यावेळी रमेशराव भवर, बाळासाहेब देशमुख, डॉ. मुकूंद देशमुख, रविराज देशमुख, लक्ष्मीकांत देशमुख, गुलाब देशमुख, माणिकराव देशमुख, बालासाहेब देशमुख, बापूराव देशमुख, प्रकाश देशमुख, संतोष देशमुख, बाबर सिद्दिकी, नंदराज दीक्षित, केशव वैद्य, घनशाम होळकर, विजय सातव, पंडित चट्टे, खन्ना यांनी निवेदन दिले. या प्रकरणी तातडीने कारवाईचे आश्वासन  दिल्‍यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी चोख पोलिस बंदोबस्‍त ठेवण्यात आला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: oppose to marriage of Ant and niece in Hingoli