हिंगोली जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश

राजेश दारव्हेकर
Thursday, 14 January 2021

निवडणुका ज्या टप्प्यावर स्थगित असतील त्या टप्प्यापासून सदर प्रक्रिया सुरू केली जाणार आहे

हिंगोली : राज्य सरकारने सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया स्थगित केल्याचे आदेश संपुष्टात आले आहेत. सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणचे सचिव यशवंत गिरी यांनी ता. १२ जानेवारी रोजी पारित केले आहेत.

निवडणुका ज्या टप्प्यावर स्थगित असतील त्या टप्प्यापासून सदर प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. परंतु २५० आणि त्यापेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था यातून वगळण्यात आल्या आहेत.

कोरोना विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका ता. ३१ डिसेंबर २०२० पर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर १२ जानेवारी २०२१ रोजी सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यासंदर्भात आदेश पारित करण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने ता. १८ जानेवारी पासून निवडणुकीस पात्र असलेल्या सहकारी संस्थांची निवडणूक घेण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.

हेही वाचाकेळी पीकविमा मंजुरीचे कृषी आयुक्तांचे आदेश, डोंगरकडा सर्कलमधील शेतकऱ्यांना दिलासा

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ सीबी व महाराष्ट्र सहकारी संस्था समितीची निवडणूक नियम २०१४ चे नियम ३ (पाच) अन्वये प्राधिकरण शासनाच्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. त्याबाबतचा कालावधी दिनांक ३१ डिसेंबर २०२० रोजी संपुष्टात आला आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर स्थगित झाल्या असतील त्या टप्प्यापासून दिनांक १८ जानेवारी २०२१ पासून निवडणुकीकरिता तयार करण्यात आलेल्या जिल्हा निवडणूक आराखड्यातील प्रथम टप्प्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया २५० व त्यापेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था वगळून सुधारित कार्यक्रमाप्रमाणे सुरू करण्यात येत आहेत. 

सदर संस्थाच्या निवडणूक प्रक्रिया पार पाडताना सामाजिक आंतर राखणे, मास्कचा वापर करणे, सॅनिटायझेशन, थर्मल स्क्रीनिंगचा उपाययोजना अमलात आणणे आवश्यक आहे. कोरोनाबाबत शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

 

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Order passed to hold elections of co-operative societies in Hingoli district