
उस्मानाबाद : एका दिवसात ७५ मिलिमीटर अवकाळी पाऊस
उमरगा : खरीप हंगामातील पेरणीसाठी शेतकरी सज्ज असला तरी पेरणी योग्य पाऊस नसल्याने पेरणीची घाई दिसत नाही. दरम्यान यंदा अवकाळी पावसाची सुरुवात उशीरा झाली पण ती दमदार होती. परंतु, एवढ्या पावसाने पेरणी शक्य नाही. पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण करून शेतकरी आता मोसमी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. नुकतीच एका दिवसात ७५ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे.
तालुक्यात गेल्या तीन-चार वर्षापासून शेतकऱ्यांचा कल नगदी पिक म्हणून सोयाबीनकडे दिसून येत आहे. यंदाही एकूण क्षेत्रापैकी जवळपास पन्नास ते साठ टक्के क्षेत्रात सोयाबीनचा पेरा होण्याची शक्यता दिसत आहे. कृषी कार्यालयाच्या माहिती नुसार बाजारात मुबलक प्रमाणात सोयाबीनचे बियाणे उपलब्ध झाले असले तरी ग्रामीण भागातील बहुतांश शेतकऱ्यांचा कल घरगुती बियाणे वापरण्यावर असतो.
शेतकऱ्यांनी घरातील बियाणे वापरण्यापूर्वी त्याची उगवण क्षमता तपासून व बिज प्रक्रिया करून योग्य बियाण्यांची निवड करणे आवश्यक आहे. सध्या कृषी विभागाने बियाणांची उगवण क्षमता तपासणी प्रात्यक्षिकाची मोहिम सुरू करण्यात आल्याची माहिती मंडळ कृषी अधिकारी डी. डी. भालेराव यांनी दिली. दरम्यान शेतकऱ्यांनी जुनीगोणपाट ओलसर करून जमिनीवर टाकून त्यावर पेरणीसाठी ठेवलेल्या बियाण्यांपैकी शंभर बियाणे घेवून गोणपाट गुंडाळून ठेवावे, दिवसातून दोन वेळा त्यावर पाणी मारून पाच दिवसानंतर उगवण झालेले बियाणे तपासून पहावेत. किमान ७० पेक्षा अधिक बियांची उगवण झाली तरच बियाणे पेरणीसाठी योग्य समजावे, अशी माहिती प्रात्यक्षिकाद्वारे दिली जात आहे.
खत, बियाणे खरेदीसाठी चौकशी
मृग नक्षत्राला आणखी पंधरा दिवस आहेत. मात्र गेल्या दोन दिवसापूर्वी झालेल्या दमदार अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा दिला आहे. मृग नक्षत्रातील पावसाची दमदार हजेरी झाली तर चाठ्यावर मुठ ठेवण्याची शेतकऱ्यांची मानासिकता तयार होते. बाजारपेठेत सोयाबीन, मूग, उडीद, संकरित ज्वारी, तूरीचे बियाणे उपलब्ध झाले आहेत. खतांच्या दरात मात्र वाढ झाली आहे. शेतकऱ्यांची सर्वाधिक मागणी असलेल्या डीएपी खताच्या दरात वाढ झाली असली तरी त्याची आवक कमी प्रमाणात होत आहे. दरम्यान गेल्या तीन-चार दिवसापूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावली. २० मे रोजी दुपारी आणि रात्री झालेल्या पावसाची नोंद ७५ मिलीमीटर झाली आहे. मात्र या पावसाची अधिकृत नोंद महसुलच्या दफ्तरी नसते. एक जूनपासून होणाऱ्या पावसाची नोंद घेतली जाते. सध्या बि- बियाणे, खरेदीसाठी विक्रेत्याकडे खरेदीसाठी थोडी गर्दी होती. शेतकरी बांधव सध्या चौकशी करून पेरणीसाठीचे अर्थ गणित जुळवत आहेत.
सहा गावाची माती परीक्षणासाठी निवड
तालुक्यातील पेठसांगवी, कडदोरा, रामपूर, बेटजवळगा, गुंजोटी, कराळी या सहा गावाची माती परीक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. माती नमुन्यातील नत्र, स्फुरद, पोटॅश, गंधक आदी घटकाची तपासणी करून शेतकऱ्यांना जमिनीची आरोग्य पत्रिका व पिक घेण्या बाबत मार्गदर्शन करण्याचे काम कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.
सध्या बिगरमोसमी पाऊस आहे. येणाऱ्या पंधरा दिवसात व त्यानंतर पेरणी योग्य पाऊस झाल्यानंतर पेरणी करावी. बी.बी.एफ. पेरणी यंत्राच्या सहाय्यानेच पेरणी केल्यास पंचवीस टक्के उत्पादनात निश्चित वाढ होते. शेतकऱ्यांनी योग्य नियोजन व बियाण्यांची निवड करूनच पेरणी करणे आवश्यक आहे. माती परिक्षणासाठी निवड केलेल्या गावातील शेतकऱ्यांनी माती परिक्षणासाठी संबंधित यंत्रणेकडे माती नमुने द्यावेत.
- सागर बारवकर, तालुका कृषी अधिकारी
Web Title: Osmanabad 75 Mm Heavy Rain Farmers Rush To Buy Fertilizer Seeds
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..