संकलन केंद्र बंद, दुधाची नासाडी

जावेद इनामदार
Monday, 30 March 2020

शहरी व ग्रामीण भागातील हॉटेल, स्वीटमार्ट, चहाची दुकाने बंद झाल्याचे कारण पुढे करून दूध संकलन बंद झाल्याने दररोज हजारो लिटर दुधाची नासाडी होऊन नुकसान होत आहे.

केसरजवळगा (जि. उस्मानाबाद) : लॉकडाऊनमुळे दुधाची मागणी घटल्याने परिसरातील दूध संकलन केंद्र गेल्या आठ दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे हजारो लिटर दुधाची दररोज नासाडी होत असल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.

कोरोनाचा परिणाम शहरी भागातील उद्योगांसह ग्रामीण भागातील दूध, भाजीपाला, शेतमालावरही मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. गावातील दोन संकलन केंद्रांत दररोज जवळपास चारशे लिटर दुधाचे संकलन केले जाते. इंदापूरच्या सोनाई दूध डेअरीसाठी २००, तर बारामतीच्या सह्याद्री दूध डेअरीसाठी २०० असे एकूण चारशे लिटर दुधाचे संकलन आलूर व उमरगा येथील एजंट करीत असतात.

गावातील जवळपास ७५ दूधउत्पादक दुधाची विक्री या दोन्ही केंद्रांवर करतात. यातूनच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र लॉकडाऊनमुळे दुधाच्या मागणीत घट झाल्याचे सांगून या दोन्ही केंद्रचालकांकडून दूध खरेदी गेल्या आठ दिवसांपासून बंदच आहे. खाद्यासाठी एका जनावरामागे सुमारे शंभर रुपयांचा खर्च येतो. उदरनिर्वाहाचा दैनंदिन खर्च दररोज दोनशे रुपये आहे. राज्य सरकारच्या मनाई आदेशात जीवनावश्यक वस्तूंच्या सर्व सेवा सुरू राहतील, असे सांगण्यात आले असले तरी प्रत्यक्षात हॉटेल, चहाविक्री, स्वीटमार्ट बंद झाल्याने दुधाची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे. पालेभाज्यांची अवस्थाही अशीच आहे. मागणी नसल्यामुळे कवडीमोल भावात भाजीपाला विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.

हेही वाचा....डॉक्टर असलेले आरडीसी म्हणतात...खरी देशभक्ती दाखविण्याची हीच वेळ

संचारबंदीच्या काळात दूध, भाजीपाला विक्रीला सरकारने परवानगी दिली असली तरी शेतकरी व दूध उत्पादकांना अपेक्षित भाव मिळत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. बहुतांश शेतकरी बाजारात माल घेऊन जात नसल्याने आवक घटली. त्यामुळे अनेकदा किरकोळ भाजी विक्रेते चढ्या दराने भाजीपाल्याची विक्री करीत असल्याचे दिसून येत आहे.

संचारबंदीच्या काळात सरकारने जीवनावश्यक वस्तूंची सेवा सुरू ठेवूनही त्याचा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडित असलेल्या उद्योगधंद्यावर मोठा परिणाम होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. 
यासंदर्भात भाजीपाला व दूधउत्पादक शेतकरी अय्युब इनामदार यांनी सांगितले की, कोरोनामुळे दूध व भाजीपाल्याच्या मागणीत कमालीची घट झाली आहे. दररोज २० लिटर गायीचे दूध मी डेअरीला घालत होतो; मात्र लॉकडाऊनमुळे शहरी व ग्रामीण भागातील हॉटेल, स्वीटमार्ट, चहाची दुकाने बंद झाल्याचे कारण पुढे करून दूध संकलन बंद झाल्याने दररोज २० लिटर दुधाची नासाडी होऊन नुकसान होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad Closing milk collection center