उस्मानाबाद : ब्रिटिश, निजाम राजवटीच्या खुणांचे संवर्धन

भूभागाची हद्द दर्शविणारे बांधकाम उस्मानाबाद जिल्ह्यात अजूनही शाबूत
Osmanabad Conservation of landmarks of British Nizam Empire
Osmanabad Conservation of landmarks of British Nizam Empiresakal

उस्मानाबाद : स्वातंत्र्यपूर्व काळातील ब्रिटिश सत्ता आणि निजामाची राजवट यांच्यातील भूभागाची हद्द दर्शवणाऱ्या खुणा उस्मानाबाद जिल्ह्यात आजही मजबूत स्थितीत आहेत. जिल्ह्यातील कसबे तडवळे आणि खामगाव या गावांच्या दरम्यान तेरणा नदीच्या पात्रामध्ये या खुणा स्पष्टपणे आढळतात. त्यांच्या संवर्धनाची गरज इतिहासप्रेमीकडून व्यक्त होत आहे. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी पाहणी करून या खुणांचे संवर्धन करण्याच्या सूचना महसूल यंत्रणेला दिल्या आहेत.

कसबे तडवळे (ता. उस्मानाबाद) गाव हे पूर्वी इंग्रज सत्तेच्या अंतर्गत होते. या गावाचा समावेश सोलापूर (ता. बार्शी) जिल्ह्यात होता. स्वातंत्र्यानंतर हे गाव उस्मानाबाद तालुक्यात समाविष्ट करण्यात आले आहे. सध्या कसबे तडवळे आणि खामगाव ही दोन्ही गावे उस्मानाबाद तालुक्यात समाविष्ट आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात खामगाव निजामाच्या कार्यक्षेत्रात होते. इंग्रज आणि निजाम राजवटींचा भूभाग स्पष्टपणे एकमेकांच्या लक्षात यावा, यासाठी विशिष्ट खुणांची निर्मिती करण्यात आली होती. या खुणा आजही स्पष्टपणे दिसतात. जमिनीत खोलवर त्यांचे बांधकाम आहे. जमिनीपासून सुमारे चार फूट उंचीवर लंबगोलाकार, सुमारे दोन ते तीन फूट व्यासाच्या या खुणा आहेत. दोन खुणांमधील अंतर सहाशे मीटरच्या दरम्यान आहे. या दोन राजवटीच्या भूभागाला तेरणा नदी ही विभागणारी असल्याचे या यावरून दिसून येत आहे.

जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी या खुणांची पाहणी केली. इतिहासाचा हा अनोखा ठेवा असून त्याचे संवर्धन करण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली. अलीकडे केलेले शासकीय बांधकाम ४० ते ५० वर्षांपर्यंत सुस्थितीत राहते. मात्र त्यावेळी अपुरी साधने असतानाही या दोन राजवटीच्या हद्द दर्शवणाऱ्या खुणा अनेक वर्षांपासून आजही मजबूत स्थितीत आहेत. त्यामुळे हा ठेवा जतन व्हावा अशी अपेक्षा इतिहासप्रेमींकडून व्यक्त होत आहे.

निजाम आणि इंग्रज सरकार यांच्यातील हद्दीच्या या खुणा आहेत. हा एक ऐतिहासिक ठेवा आहे. या खुणा अजूनही मजबूत स्थितीमध्ये दिसतात. त्यामुळे हा ठेवा सुरक्षित ठेवावा, यासाठी महसूलच्या संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना केल्या आहेत. उस्मानाबाद जिल्ह्याच्यासाठी ठेवा जतन झाला पाहिजे.

- कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हाधिकारी, उस्मानाबाद

सुमारे ५०० ते ७०० मीटर अंतरावर या खुणा दिसून येतात. या भागांमध्ये रस्त्याची कामे करताना या बाबी निदर्शनास आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिल्यानंतर संबंधित ठिकाणी संरक्षित कुंपण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार हे काम करणार आहोत.

- एन. डी. नागटिळक, मंडळ अधिकारी, येडशी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com