esakal | उस्मानाबाद जिल्ह्याची औषधविक्री व्यवस्था रामभरोसे?
sakal

बोलून बातमी शोधा

DRUGS

उस्मानाबाद जिल्ह्याची औषधविक्री व्यवस्था रामभरोसे?

sakal_logo
By
सयाजी शेळके

उस्मानाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर जिल्ह्यातील औषध विक्री व्यवस्था रामभरोसे सुरू आहे. एकही `औषध निरीक्षक`अधिकारी नसल्याने लातूर येथील अधिकाऱ्यांकडे पदभार देण्यात आला आहे. त्यात दुसऱ्या लाटेनंतर औषध दुकानांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट गंभीर होती. ऑक्सीजन पुरवठ्यासह इतरही अनेक आघाड्यावर सामान्य नागरिकांना याचा फटका बसला. रेमेडीसीव्हर इंजेक्शनसाठी संपूर्ण महसूल व्यवस्था कामाला लागली होती. तरीही अनेकांना औषधाच्या तुटवड्यामुळे अपेक्षित उपचार मिळू शकले नाहीत. तर काही ठिकाणी याचा काळाबाजारही झाला.

हेही वाचा: ‘हीलींग हँड्स हर्ब्स’ला आयुर्वेदिक उत्पादनांचे भारतीय पेटंट

उपचार देणाऱ्या अनेक दवाखान्यातूनच याबाबात गोंधळाचे वातावरण तयार होत होते. दरम्यान आता कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मात्र जिल्ह्यात सध्या एकही `औषध निरीक्षक (ड्रग इन्स्पेक्टर)` कार्यरत नाहीत. जिल्ह्यात या पदाच्या दोन जागा आहे. दोन्ही रिक्तच असल्याने लातूर येथील अधिकाऱ्यांकडे पदभार देण्यात आला आहे.

औषध व्यवस्था रामभरोसे

जिल्ह्यात सध्या परवाना असलेल्या दुकानातून औषध विक्री केली जाते. दरम्यान विविध प्रकारची आणि वेगवेगळ्या कंपन्यांची औषधे बाजारात येतात. ती दुकानामध्ये रुग्णांच्या वापरासाठी आल्यानंतर यातील काही औषधांचे टेस्टींग केले जाते. जिल्ह्यात कार्यरत असलेले `औषध निरीक्षक` याचे सँपल घेतात. ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले जाते. शिवाय औषध दुकानात योग्य प्रकारे औषधांची विक्री होते का, काही कालबाह्य औषधे आहेत का, असे विविध पैलू तपासण्याचे काम `औषध निरीक्षक` करतात. मात्र हे पद सध्या रिक्त आहे. त्यामुळे जिल्ह्यात औषध विक्री व्यवस्थेचा कारभार रामभरोसेच असल्याचे दिसून येत आहे.

काम वाढले, अधिकारी कमीच

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर औषध दुकानांची संख्या झपाट्याने वाढली आहे. अगदी एका गल्लीत दोन-दोन औषध दुकाने थाटली जात आहेत. त्यामुळे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांची संख्या मोठी असणे गरजेचे आहे. परंतु, काम वाढलेले असतानाही अधिकाऱ्यांची वानवा असल्याने अन्य जिल्ह्यातील अधिकाऱ्यांकडे पदभार दिला जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

loading image
go to top