Osmanabad : गरोदर मातांमध्ये वाढताेय ॲनिमिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Osmanabad

Osmanabad : गरोदर मातांमध्ये वाढताेय ॲनिमिया

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील ४४ टक्के गरोदर मातांमध्ये ५० टक्के अॅनिमिया आढळून आल्याने त्याकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची वेळ आली आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून प्रमाण घटविण्यासाठी प्रयत्न केले जात असून त्यासाठी विविध उपक्रम देखील हाती घेतले आहेत. प्रमाण अधिक असून राज्याचे आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांच्याकडूनही अशा संवेदनशील विषयाकडे लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

उस्मानाबाद जिल्ह्याचा नीती आयोगाच्या आकांक्षीत जिल्ह्यात समावेश आहे. माता आणि बालकांच्या आरोग्यात तसेच पोषण स्थितीसंबधी निती आयोगाच्या निर्देशांकात सुधारणा होण्यासाठी महिलांच्या व बालकांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे असते. सुदृढ माता आणि सुदृढ बालक घडविण्यासाठी आरोग्यसोबत पोषण स्थितीवर भर देण्याची आवश्यकता असून त्यानंरच अॅनिमिया मुक्तीच्या दिशेने वाटचाल करणे शक्य होणार आहे. शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता झाल्याने टिशू आणि मांसपेशी यांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडतो. त्यामुळे शरीर शक्तीहीन होत जाते याला अॅनिमिया म्हणतात. प्रत्येकवेळी थकवा जाणवणे, उठता-बसता चक्कर येणे, त्वचा आणि डोळे पिवळे पडणे, ह्रदयाची असामान्य धकधक, श्‍वास घेण्यास त्रास होणे, तळवे आणि हात थंड पडणे इत्यादी अॅनिमियाची लक्षणे आहेत.

थोडक्यात शरीरात रक्ताची कमतरता होणे यालाच अॅनेमिया म्हणतात. त्यामुळे शरीरात रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी आहारात काही बदल केल्यास फायदा होऊ शकतो. जिल्ह्यात १५ ते २४ वर्ष वयोगटातील युवा मुलीतही अॅनेमिया आढळून आला आहे,हे प्रमाण मोठे असल्याने मातेला प्रसूतीवेळी गुंतागुंतीचे प्रसंग उद्भवतात, कमी वजनाचे बाळ जन्मते, बालकांत कुपोषण वाढते.

सोबतच माता मृत्यू आणि बालमृत्यूच्या प्रमाणात वाढ होण्याचा धोका संभवू शकतो. यावर वेळीच प्रतिबंध आणि उपचार केल्यावर सुदृढ बालक आणि सुदृढ माता निर्मितीस मोलाचे योगदान मिळू शकते. कुपोषणामागे प्रमुख कारणांपैकी अॅनिमिया हे एक प्रमुख कारण आहे. सुदृढ माता आणि बालक तयार व्हावेत म्हणून जिल्ह्यात अॅनिमिया मुक्त युवा आणि अॅनेमिया मुक्तमाता उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

टॅग्स :OsmanabadPregnanthealth