जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका कधी होणार?

तानाजी जाधवर
Thursday, 26 November 2020

जिल्ह्याचा विचार केला तर अ,ब,क व ड या चारही श्रेणीतील एकूण एक हजार 60 संस्थाच्या निवडणुका घेणे अपेक्षित आहे. यामध्ये 'अ' गटाच्या चार महत्वाच्या संस्थाचा समावेश आहे. जिल्हा सहकारी बँकेचीही निवडणूक या टप्प्यामध्ये होणार आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलेल्या होत्या.

उस्मानाबाद : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे लांबणीवर पडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणूका घेण्याचे नियोजन सध्या सुरु झाले असून येत्या 31 डिसेंबरनंतर जिल्ह्यातील सहकारी संस्थांची निवडणूक होणार असल्याची शक्यता सहकार विभागाकडून व्यक्त होत आहे. त्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाची तयारी सुरु झाली असून त्यासंबंधी हालचाली सुध्दा दिसत आहे. टप्प्याटप्प्याने या निवडणुका घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

जिल्ह्याचा विचार केला तर अ,ब,क व ड या चारही श्रेणीतील एकूण एक हजार 60 संस्थाच्या निवडणुका घेणे अपेक्षित आहे. यामध्ये 'अ' गटाच्या चार महत्वाच्या संस्थाचा समावेश आहे. जिल्हा सहकारी बँकेचीही निवडणूक या टप्प्यामध्ये होणार आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलेल्या होत्या. त्यातही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचाही कार्यक्रम जाहीर होत असल्याने सहकारी संस्थानी देखील त्यांच्या निवडणुका घेण्याचे नियोजन सूरु केले आहे. आता ग्रामपंचायत निवडणूक अगोदर की नंतर याचा निर्णय अजून घेतलेला नाही. मात्र आता 2021 च्या सुरुवातीलाच सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा धुराळा उडणार असे दिसत आहे. साहजिकच पुढील महिन्यांपासून त्यानिमित्ताने जिल्ह्याचे राजकारण चांगलेच तापणार असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यामध्ये 'अ' गटाच्या चार, 'ब' गटाच्या 363, 'क' गटाच्या 220 तर 'ड' गटाच्या 473 सहकारी संस्थांची निवडणूक बाकी आहे. त्यामध्ये कोणत्या गटाच्या निवडणुका पहिल्यांदा घेतल्या जाणार त्याचे टप्पे याबाबत देखील तयारी सूरु करण्यात आली आहे. या अगोदर सहकारी संस्थांच्या निवडणुका चार वेळा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सरकारच्या कर्जमाफी योजनेसाठी जानेवारीमध्ये या निवडणुका तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

त्यानंतर कोरोनाची साथ आल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते, त्या काळात निवडणुका घेणे शक्य नसल्याने 17 मार्चला पुन्हा तीन महिन्यांचा कालावधी वाढवण्यात आला होता. त्याच अनुषंगाने दोन वेळा निवडणुकांना मुदतवाढ मिळाली होती. आता मात्र कोरोनाचे सावट काही अंशी कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे 31 डिसेंबरनंतर या निवडणुका पार पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad Elections for co operative societies in the district are likely to be held after December 31