शेतकऱ्याची मुलगी झाली सहायक विक्रीकर आयुक्त

डॉ. भागीरथी पवार
डॉ. भागीरथी पवार

उमरगा (जि. उस्मानाबाद) : ग्रामीण भागातील होतकरू व कठोर मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेतील यश खुणावत आहे. २०१९ मध्ये झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तालुक्यातील नारंगवाडीच्या दोघांनी उज्ज्वल यश मिळविले आहे. डॉ. भागीरथी भरत पवार हिने सहायक विक्रीकर आयुक्त, तर सागर दिलीप पवार हा शिक्षणाधिकारीपदाची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे.

ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील अनेक विद्यार्थी स्वकर्तृत्वाच्या बळावर स्पर्धा परीक्षेत उज्ज्वल यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहेत. नारंगवाडी येथील भरत पवार या शेतकरी कुटुंबातील तिघांनी उच्च शिक्षणाचे शिखर गाठण्यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. एक मुलगा शरद अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून सध्या अमेरिकेत उच्चपदावर नोकरी करीत आहे. दुसरा मुलगा रितेश हा लातूरला वैद्यकीय शिक्षणाच्या शेवटच्या वर्षाला आहे. मुलगी डॉ. भागीरथी हिने नुकताच निकाल लागलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सहायक विक्रीकर आयुक्त पदाची (श्रेणी- एक) यश मिळविले आहे. भागीरथी पवार हिचे प्राथमिक शिक्षण नारंगवाडीच्या जयराम विद्यालयात झाले.

सहावीपासून दहावीपर्यंतचे शिक्षण तुळजापूरच्या जवाहर नवोदय विद्यालयात झाले. गुणवत्तेच्या बळावर अकरावी व बारावीचे शिक्षण लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयात झाले. वैद्यकीय पदवीचे (एमबीबीएस) शिक्षण औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पूर्ण झाल्यानंतर नाईचाकूर (ता. उमरगा), मदनसुरी (ता. निलंगा) येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले.

पुणे येथील ससून रुग्णालयात नोकरी सुरू केली. नोकरी करीतच तिने स्पर्धा परीक्षेतील यशाला गवसणी घातली. सर्वप्रथम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत २०१७ मध्ये उपशिक्षणाधिकारी, तर २०१८ मध्ये कक्ष अधिकारी म्हणून परीक्षा उत्तीर्ण झाली होती. या पदापेक्षा श्रेणी- एक पदाची ईर्षा बाळगत भागीरथीने २०१९ झालेल्या परीक्षेत सहायक विक्रीकर आयुक्त पदाची (श्रेणी- एक) परीक्षेत यश मिळविले. 

प्राथमिक शिक्षिकेचा मुलगा झाला शिक्षणाधिकारी 
मूळचा राहणारा नारंगवाडीचा; पण सध्या शहरात वास्तव्यास असलेल्या सागर दिलीप पवार याने कठोर परिश्रम घेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करून शिक्षणाधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. सागरने माध्यमिक शिक्षण शहरातील महात्मा गांधी विद्यालयात पूर्ण केल्यानंतर लातूरच्या महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातून बारावीचे शिक्षण पूर्ण केले.

२०१६ मध्ये कराड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले. नोकरीची संधी होती; परंतु केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. वडील शेतकरी, तर आई प्राथमिक शिक्षिका पदावरून सेवानिवृत्त झाली, तर लहान भाऊ लातूर येथील दयानंद महाविद्यालयात डी.फार्मसी. करीत आहे. आर्थिक परिस्थितीवर मात करीत २०१७ मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन केंद्रीय पोलिस बलात नियुक्ती झाली; मात्र देशाच्या सीमेवर सातत्याने सेवेत राहावे लागत असल्याने पुढचे ध्येय निश्चितीसाठी या सेवेत ते रुजू झाले नाही. नुकताच निकाल लागलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सागरने यश मिळवीत शिक्षणाधिकारीपदाला गवसणी घातली. 
 

शेतीत काम करणाऱ्या आई-वडिलांनी मुलगी उच्चपदावर जाण्याचे स्वप्न बाळगले. या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी त्यांचे मार्गदर्शन, त्यांचा आधार मिळाला. दोन भावंडांच्या शिक्षणासाठी प्रेरणा मिळाली. शिक्षण घेत, नोकरी करीत स्पर्धा परीक्षेची तयारी केली आणि त्यात यश मिळाले. सहायक विक्रीकर आयुक्तपदावर नेमणूक मिळाल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणार आहे. ग्रामीण भागातील मुला-मुलींमध्ये बुद्धिमत्ता आहे; मात्र त्यासाठी सचोटी आणि प्रबळ इच्छाशक्ती असायला हवी. 
- भागीरथी पवार. 

आई शिक्षिका असल्याने शिक्षणाची गोडी अधिक वाढली. स्पर्धा परीक्षेतील यशासाठी प्रबळ इच्छाशक्ती महत्त्वाची असते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याने आत्मविश्वास वाढला आहे. येणाऱ्या काळात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळण्याचे ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. 
- सागर पवार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com