हळद उकडताना झालेल्या स्फोटात एक ठार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 मार्च 2020

कच्ची हळद काढल्यानंतर कुकरमध्ये उकडून घ्यावी लागते. कच्ची हळद काढून ती कुकरमध्ये उकडून घेत असताना स्फोट होऊन ही घटना घडली. या घटनेत अन्य तीन जखमी झाले आहेत.

उमरगा (जि. उस्मानाबाद) : कच्ची हळद काढून ती कुकरमध्ये उकडून घेत असताना कुकरचा स्फोट होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला, तर तीनजण जखमी झाले. तालुक्यातील एकुरगा शिवारात शुक्रवारी (ता. २७) रात्री साडेअकराच्या सुमारास ही दुर्घटना घडली. 

तालुक्यातील एकुरगा गावासह परिसरातील गावात कच्ची हळद काढण्याचे काम काही ठिकाणी सुरू आहे. कच्ची हळद काढल्यानंतर कुकरमध्ये उकडून घेण्याची यंत्रणा असते. एकुरगा येथील शेतकरी दयानंद जवळगे यांच्या शेतात शुक्रवारी रात्री साडेअकराच्या दरम्यान कुकरच्या साहाय्याने हळद उकडण्याची प्रक्रिया सुरू असताना अचानक कुकरचा स्फोट झाल्याने मुकर्रम बशीर पटेल (वय ४५, रा. एकुरगा, ता. उमरगा) यांचा जागीच मृत्यू झाला.

तर कुकरमालक आलिम लायक पटेल (३२), शेतकऱ्याचा मुलगा महादेव जवळगे (१९), भाचा महेश कलमाने (२३, सर्व रा. एकुरगा) हे तिघे जखमी झाले. कुकरच्या स्फोटाच्या आवाजाने परिसरातील शेतकरी, नागरिक भूकंप झाला म्हणून घाबरून रस्त्यावर आले होते. या भागात पहिल्यांदाच झालेल्या या दुर्दैवी घटनेने गावातील हळद पीक उत्पादक शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad One killed in explosion while boiling Turmeric