तुळजापूर शहरातील गर्भवती माता कोरोना पॉझिटीव्ह

जगदीश कुलकर्णी
बुधवार, 20 मे 2020

तुळजापूर शहरात रविवारी (ता. १७) ही महिला पुण्याहुन आली होती. शहरात आल्यानंतर त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. मंगळवारी मध्यरात्रीनंतर तिचा अहवाल प्राप्त झाला. दरम्यान, त्यांना पुण्याहून आणणारा वाहनचालक, तसेच महिलेच्या कुटुंबीयासह वाहनचालकाच्या नातेवाईकांना आयसोलेशन कक्षात रात्रीच दाखल करण्यात आले आहे.

तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : तुळजापूर शहरात पुणे येथून आलेल्या २१ वर्षीय गर्भवती महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे प्रशासनाने सर्व यंत्रणा सतक॔ केली आहे.

तुळजापुर शहरातील भोसले गल्ली भागात राहणारी विवाहिता १७ मे रोजी पुणे येथून शहरात आली आहे. संबंधित महिलेचा स्वॅब त्याच दिवशी घेण्यात आला होता. मंगळवारी (ता. १९) मध्यरात्रीनंतर अहवाल प्राप्त झाला आहे. यासंदर्भात उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. चंचला बोडके यांनी सांगितले, की सदर महिला पुण्याहुन तुळजापूरला आली होती.

शहरात आल्यानंतर त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. मंगळवारी मध्यरात्रीनंतर तिचा अहवाल प्राप्त झाला. तिला पुण्याहून आणणारा वाहनचालक, तसेच महिलेच्या कुटुंबीयासह वाहनचालकाच्या नातेवाईकांना आयसोलेशन कक्षात रात्रीच दाखल करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. 
प्रभारी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप टिप्परसे, वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. चंचला बोडके, तहसीलदार सौदागर तांदळे, मुख्याधिकारी आशिष लोकरे यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांनी रात्री एकनंतर अन्य लोकांना रूग्णालयात आणले. 

हेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा...

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे नवीन सहा रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे सध्या उपचार सुरु असलेली रुग्णसंख्या आता तेरावर पोचली असून, बरे होउन तीन जण घरी परतले आहेत. आज उस्मानाबाद शहरामध्ये एक, तुळजापूर, लोहारा, भूम प्रत्येकी एक, तर परांड्यामध्ये दोन असे एकूण सहा रुग्ण आढळून आले आहेत. तर यापूर्वी कळंब तालुक्यामध्ये पाच, तर वाशी, भूम व परांडा या तीन तालुक्यांत प्रत्येकी एक असे एकूण सात रुग्ण आढळले होते. 

दरम्यान, उस्मानाबाद शहरातील रुग्णाला कर्करोग असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे वृत्त आहे. त्याचे कुटुंब मुंबईहून सोलापूरला एका खासगी वाहनाने आले. तर सोलापूर ते तमलवाडीपर्यंतचा प्रवास त्यांनी पायी केला. त्यानंतर उस्मानाबाद शहरातून तामलवाडीपर्यंत दुचाकीने गेलेले नातेवाईक त्यांना घेऊन आल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या शहरातील सर्व जणांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे. 

हाफकिनच्या सहकार्याने लसीचे संशोधन, मंत्री अमित देशमुख

परांडा तालुक्यातील खंडेश्वरवाडीचे दोन रुग्ण आहेत. भूम तालुक्यातील गिरवलीच्या एका तेरा वर्षीय मुलाला कोरोनाचा लागण झाली आहे. लोहारा तालुक्यातील जेवळीचा एक तरुण असून, तुळजापूरची एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आली असून, ती पुण्याहुन परतली आहे. तर अन्य पाच जण मुंबईहून आलेले आहेत.

जिल्हयात आल्यानंतर सर्व सहा जणांना क्वारंटाईन केल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक राजाभाऊ गलांडे यांनी दिली. यापूर्वी कळंब तालुक्यातील पाथर्डीचे दोन, हावरगावचे दोन, कळंब शहरातील एक, भूम तालुक्यातील पन्हाळवाडीचा एक, तर परंडा तालुक्यातील सरणगावातील एकाला कोरोनाची बाधा झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad Pregnant mother in Tuljapur city corona positive