वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी; रब्बीची पिकं आडवी

सयाजी शेळके
Friday, 19 February 2021

शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात शुक्रवारी (ता. १९) पहाटे दोनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली

उस्मानाबाद: शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात शुक्रवारी (ता. १९) पहाटे दोनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. यामध्ये रब्बी ज्वारीचे पिकं आडवी झाली असून काढणीसाठी आलेला गहू जमीनीलगत लोळल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शिवाय आंबा आणि द्राक्ष बागांनाही याचा फटका बसला आहे.

गुरुवारी गावागावत शिवाजी महाराज जयंती साजरी करण्याच्या तयारीत कार्यकर्ते मग्न होते. त्यात शनिवारी पहाटेच्या सुमारास वादळी वारा सुरू झाला. त्यापाठोपाठ पावसालाही सुरुवात झाली. जोरदार वारा आणि तितक्याच
प्रमाणात गारठाही होता. त्यामुळे शिवजयंतीची तयारी करणाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. दरम्यान पावसाचा जोर चांगलाच होता. शिवाय त्यासोबत वाराही होता. सध्या ज्वारीचे पिक अंतिम टप्प्यात आहे. काही ठिकाणी ज्वारी
काढण्यास आली आहे. वादळी पावसाने अनेक ठिकाणचे ज्वारीचे पीक जमिनदोस्त झाले.

हिंगोली जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मेघगर्जनेसह पावसाची रिमझिम

याशिवाय काही बहुतांश शेतकरी गव्हाचेही पिक घेतात. सध्या गहूही काढणीच्या अवस्थेत आहे. वादळीवाऱ्याने गव्हाचे पीकही आडवे झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पहाटे दोनच्या सुमारास सुरू झालेला पाऊस सकाळी सात वाजेपर्यंत सुरूच होता. तर काही ठिकाणी सकाळी १० वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील हरभरा, करडई अशा रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले
आहे.

आंबा, द्राक्षांचे मोठे नुकसान-

जिल्ह्यात केशर आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सध्या जिल्ह्यातील केशर आंब्यांना कैऱ्या मोठ्या प्रमाणात दिसत आहे. मात्र वादळी वाऱ्याने कैऱ्या जमीनीवर पडल्या आहेत. त्यामुळे आंब्याचेही नुकसान झाले आहे. शिवाय तुळजापूर, भूम, उस्मानाबाद आणि वाशी तालक्यात द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. अशा भागातही मोठ्या प्रमाणात द्राक्षांचे नुकसान झाले आहे. पावसाने द्राक्ष फुटले असून वादळी वाऱ्याने बागाही आडव्या झाल्या आहेत.

बीडचा शेतकरी जिगरबाज; वीज देयक भरण्यात परिमंडळात आघाडी

शिवजयंतीवरही परिणाम-

शहरात सकाळी आठ वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. शिवाय वातावरणात गारठा आणि वादळ सुरू असल्याने अनेकजण घराबाहेर पडले नव्हते. रस्त्यावरही फारशी गर्दी दिसत नव्हती. परिणामी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहतूक संथ गतीने सुरू होती.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad raining news Heavy presence of rain force winds rabbis crops destroyed