esakal | परतीचा खडतर प्रवास, गावाची ओढ स्वस्थ बसू देईना
sakal

बोलून बातमी शोधा

उमरगा : उत्तर प्रदेशातील नागरिकांना रेल्वेने गावाकडे पाठविण्यासाठी महसूल प्रशासनाने बुधवारी दोन बसमधून ४३ जणांना औरंगाबादला पाठविले..

जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे यांच्याकडून मिळालेल्या परवानगीनंतर बुधवारी (ता. १३) औरंगाबाद रेल्वेस्टेशनपर्यंत दोन बसची सोय करण्यात आली.

परतीचा खडतर प्रवास, गावाची ओढ स्वस्थ बसू देईना

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (जि. उस्मानाबाद) : लॉकडाउनमध्ये अडकलेल्या परराज्यांतील लोकांना पाठविण्यासाठी महसूल प्रशासनाकडून नियोजन सुरू आहे. उत्तर प्रदेशातील ४३ कामगारांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी रेल्वेची सोय असल्याने जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे यांच्याकडून मिळालेल्या परवानगीनंतर बुधवारी (ता. १३) दोन बसमधून या कामगारांना औरंगाबाद रेल्वेस्टेशनपर्यंत सोडण्यात आले.

लॉकडाउनमुळे गेल्या दीड महिन्यापासून येथेच अडकून राहिलेल्या कामगार, मजुरांच्या परतीच्या प्रवासासाठी सवलत मिळाल्यानंतर उमरगा तालुक्यात अडकून पडलेल्या तेलंगणा, बिहार, गुजरात, झारखंड, हरियाना, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आंध्र, कर्नाटक, मध्य प्रदेश व राजस्थानातील ६५२ लोकांनी तहसील कार्यालयात नावनोंदणी केली होती.

उदगीरचे आणखी चार रूग्ण कोरोनामुक्त, फुलांनी स्वागत करुन सोडले घरी

आतापर्यंत ३९३ लोकांना आपापल्या राज्यात जाण्याची परवानगी देण्यात आल्याने काही प्रशासनामार्फत तर काही खासगी वाहनाने लोक मार्गस्थ झाले. दरम्यान, बुधवारी पहाटे चार वाजता व सकाळी दहा वाजता दोन बसने उत्तर प्रदेशातील ४३ जणांना औरंगाबादपर्यंत पोचवण्यात आले. त्यांच्यासोबत मंडळ अधिकारी जयवंत गायकवाड, तलाठी ए. बी. कोळी यांना पाठवण्यात आले.

आगारप्रमुख पी. व्ही. कुलकर्णी, तहसीलचे कर्मचारी शाहूराज भोसले, पंकज कुलकर्णी, डी. ए. पवार, समुपदेशक विजय जाधव यांनी प्रवाशांना सुखकर प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. गुरुवारी (ता.१४) उत्तर प्रदेशला जाण्यासाठी रेल्वेची सोय असल्याने नोंदणी केलेल्या उर्वरित लोकांना पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

चिमुकल्यांसह कुटुंबाचा पायी प्रवास 
मुंबईच्या कल्याणशीळ फाटा येथून कर्नाटकातील कमलापूर तालुक्यातील गोघीतांडा, सलगर येथील मजुरांचे कुटुंब पायी निघाले होते. उमरगा ते चौरस्त्यादरम्यान विजय जाधव, रवींद्र कटके, सुनील बिराजदार यांनी त्या कुटुंबाची विचारपूस केली. तहसीलदार संजय पवार यांना याची माहिती सांगितल्याने महाराष्ट्र-कर्नाटक सीमेपर्यंत त्या लोकांना बसने पोचवण्यात आले.

श्री. जाधव यांनी त्यांच्यासाठी केळीची तर हॉटेल राधाकृष्ण यांच्यामार्फत डाळ-भाजीची सोय करण्यात आली होती. दरम्यान, अठरा लोकांच्या या समूहात सात लहान मुले आहेत. एक मुलगी तर अकरा महिन्यांची आहे. आईच्या कुशीत ती चिमुकली रस्त्याचे अंतर कापत होती. लॉकडाउनने अनेक गरीब, मजूर कुटुंबावर कधी नव्हे ते वाईट दिवस आले आहेत. त्यातून सावरत लोक गावाकडे परतत आहेत. रस्त्याने अनेकांनी केलेल्या सोयीबाबत ते कृतज्ञता व्यक्त करतात.