पोलिसांकडून गरजूंना अन्नधान्याचा पुरवठा

अब्बास सय्यद
गुरुवार, 26 मार्च 2020

कष्टकरी, गोरगरिबांचे काम थांबल्याने त्यांच्यासह कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून गुरुवारी (ता.२६) शहरातील विविध भागांतील गरजूंना गहू, तांदूळ, ज्वारी, मीठ, मिरची, मसाला, साखर, तेल, डाळी आदी पदार्थ असलेली अन्नधान्यांची किट पोलिसांनी पोच केली.

भूम, (जि. उस्मानाबाद) : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लागू केलेल्या संचारबंदीच्या कालावधीत घरात बसून राहिल्याने कष्टकरी, मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. ते उपाशीपोटी राहू नये म्हणून भूम पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ, सहायक पोलिस निरीक्षक मंगेश साळवे व येथील पोलिस ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने शहरातील गरजू कुटुंब, निराधारांना अन्न व धान्याचा पुरवठा करण्यात येत आहे.

गेल्या दोन दिवसांपासून शहरातील विविध भागांतील निराधारांचे अन्नावाचून हाल होत आहे. दैनंदिन रोजगार उपलब्ध करून कशीतरी पोटाची खळगी भरायची; मात्र संचारबंदीमुळे मोठ्या प्रमाणात कामे बंद असल्याने मोलमजुरी नाही, बाहेर फिरताही येत नाही. त्यामुळे पोटाची खळगी कशी भरायची, असा प्रश्न हातावर पोट असणाऱ्या मजुरांचा झाला आहे.

या कष्टकरी, गोरगरीब कुटुंब व मजुरांचे कामही थांबल्याने त्यांच्यासह कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून गुरुवारी (ता.२६) शहरातील विविध भागांतील गरजूंना गहू, तांदुळ, ज्वारी, मीठ, मिरची, मसाला, साखर, तेल, डाळी आदी पदार्थ असलेली अन्नधान्यांची किट पोलिस पोच करीत आहेत.

यावेळी पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र गडवे, पोलिस नाईक आकाश उंदरे, शशिकांत खोत, श्री. कुरेशी, श्री. गाडगे, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल बाराते, मुशीर शेख आदी उपस्थित होते. 
याशिवाय शहरातील किराणा व्यापारी रियाज हन्नुरे यांनीही मोलमजुरीवर ज्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे, अशा गरजूंना घरपोच अन्नधान्य वाटप करीत आहेत. 

शहरातील प्रत्येक भागांतील गरजूपर्यंत ही मदत पोचली पाहिजे, यासाठी प्रत्येक गल्लीत नगरसेवक, सामाजिक संघटनेच्या माध्यमातून गरजू लोकांची नावे घेऊन भूम पोलिस ठाण्याच्या वतीने अन्न व धान्याची वाटप करण्यात येत आहे. 
- रामेश्वर खनाळ, पोलिस निरीक्षक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad Supply of food to the needy by the police