सुमारे साडेतीनशे नागरिकांना पोलिसांनी रोखले

अविनाश काळे
Saturday, 28 March 2020

कसगी ग्रामपंचायतीने संपूर्ण लोकांसाठी भोजनाची व्यवस्था केली. शनिवारी (ता. २८) पहाटेपर्यंत काहीच हालचाली झाल्या नसल्याने ग्रामस्थांनी सकाळीही भोजनाची व्यवस्था केली.

उमरगा (ता. उस्मानाबाद) : रोजीरोटीसाठी मुंबई येथे कामाला गेलेल्या तेलंगणा राज्यातील जवळपास तीनशे ते साडेतीनशे नागरिकांना गावाकडे परतत असताना उमरगा तालुक्यातील कसगी गावाजवळील महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर तैनात कर्नाटक पोलिसांनी त्यांना शुक्रवारी (ता. २७) रात्री रोखले. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांमध्ये बरीच चर्चा होऊनही कर्नाटक पोलिसांनी गावाकडे परतणाऱ्या लोकांना सोडण्यासाठी नकारघंटा दाखविल्याने लेकराबाळांची चांगलीच दैना झाली. दरम्यान रात्री उमरग्याचे संपूर्ण प्रशासन सीमेवर होते.

कसगी ग्रामपंचायतीने संपूर्ण लोकांसाठी भोजनाची व्यवस्था केली. शनिवारी (ता. २८) पहाटेपर्यंत काहीच हालचाली झाल्या नसल्याने ग्रामस्थांनी सकाळीही भोजनाची व्यवस्था केली. येथील प्रशासनाकडून तेलंगणा व कर्नाटक प्रशासनाशी चर्चा सुरू आहे. दहा टेम्पोंतून आलेल्या मजुरांना त्यांच्या गावापर्यंत पोचविण्याचे नियोजन सुरू होते. 
कोरोना विषाणू संसर्गाच्या भितीने रोजीरोटीसाठी मुंबई उपनगरात राहणाऱ्या व्यक्तींना गावाकडची ओढ लागली आहे. परंतु जिल्हा बंदी, सीमा बंदी असल्याने परराज्यातील लोकांना काटेरी मार्ग पूर्ण करावा लागतो आहे

तेलंगणा राज्यातील नारायण पेठ जिल्ह्यातील अनेक कुटुंब उदरनिर्वाहासाठी मुंबई परिसरात कामाला होते. कोरोना विषाणूच्या भितीने दहा टेम्पोंतून जवळपास तीनशे ते साडेतीनशे लोक गावाकडे निघाले होते. महाराष्ट्रातून त्यांचा प्रवास कसा तरी पूर्ण झाला आणि ते जकेकूर - चौरस्ता मार्गे कलबुर्गी मार्गाने निघाले. कसगी गावाजवळील सीमेच्या अलीकडेच त्यांना कर्नाटक पोलिसांनी अडविले. तेव्हा सर्व मजूर व त्यांचे कुटुंबिय गोंधळून गेले.

उमरग्याचे पोलिस निरीक्षक माधवराव गुंडिले घटनास्थळी गेले. त्यांनी तेथील पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली, मात्र मार्ग निघत नव्हता. उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराधा उदमले, तहसीलदार संजय पवार यांच्यासह पोलिस कर्मचारी सीमेवर पोचले. कर्नाटकातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तरीही मार्ग निघत नसल्याने शनिवारी पहाटे तीनपर्यंत प्रशासन सीमेवर थांबून होते. या संदर्भात आळंदचे आमदार सुभाष गुत्तेदार यांच्याशी चर्चा केल्यानंतर कर्नाटकातील जवळपास ६० लोकांना ओळखपत्र दाखवून सोडण्यात आले.

दरम्यान तेलगंणातील जवळपास तीनशे ते साडेतीनशए लोक अजुनही तेथेच आहेत. त्यांना गावाकडे पाठविण्यासाठी उमरगा तहसील कार्यालयात शनिवारी सकाळी अकरा वाजता बैठक सुरू झाली. कर्नाटक व तेलगंणा राज्याच्या सचिव पदापर्यंतच्या अधिकाऱ्यांशी याबाबत वरिष्ठ पातळीवरून चर्चा सुरू होती.

कसगी ग्रामपंचायतीने केली भोजनाची व्यवस्था 
शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत मार्ग निघत नसल्याने आमदार ज्ञानराज चौगुले व प्रशासनाने अडकून पडलेल्या नागरिकांच्या भोजनाच्या व्यवस्थेचे नियोजन करीत असताना उपासपोटी असणाऱ्या मजुरांच्या कुटुंबांना कसगी ग्रामपंचायतीने भोजन व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आणि श्री. अत्तार यांच्या पेट्रोल पंपावर भोजनाची व्यवस्था केली. शनिवारी सकाळीही या लोकांना भोजन देण्यात आले.

कसगीचे माजी सरपंच हनुमंत गुरव, पोलिस पाटील मंगल कांबळे, नबीसाब मुल्ला, शिवपुत्र पुजारी, विश्वनाथ जगदाळे, संजय बदोले, सुनील गुरव, श्रीमंत बिराजदार, बसवराज घोदे, महेश गुरव, अनिल पुजारी, रमेश कलशेट्टी, नितीन मुलगे, अरुण गोटूर, शरण कांबळे यांच्यासह तरुणांनी भोजन व्यवस्थेसाठी पुढाकार घेतला. 
 

तेलंगणातील नागरिकांना त्यांच्या गावापर्यंत पोचवण्यासाठी शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत प्रशासनाने वरिष्ट पातळीवर बोलणी केली. शनिवारी तेलंगणा व कर्नाटक राज्यातील वरिष्ठ पातळीवर येथील वरिष्ठाकडून चर्चा सुरू आहे. यातून सकारात्मक निर्णय होईल अशी आशा वाटते. 
- विठ्ठल उदमले, उपविभागीय अधिकारी 
संकटकाळात मदत करण्याची कसगी ग्रामस्थांची परंपरा आहे. सीमाबंदीमुळे अडकलेल्या मजूर व त्यांच्या कुटुंबातील महिला व लहान मुलांच्या भोजनाची व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय झाला तर ठीकच आहे, नसेल तर आम्ही कसगीकर त्यांच्या भोजनाच्या व्यवस्थेसाठी तत्पर आहोत. 
- हनुमंत गुरव, माजी सरपंच 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad Three Hundred Citizens Were Stopped By The Police