esakal | चिंता वाढली : उस्मानाबादेत कोरोनाचे नवीन तीन रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

नवीन तीनही रुग्ण कळंब तालुक्यातील आहेत. मुंबईतून गावाकडे परतलेल्या एका दाम्पत्यासह महसूल विभागाच्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती आहे. दरम्यान, सोमवारी सायंकाळी परंडा तालुक्यातील एका युवकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. या चारही रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

चिंता वाढली : उस्मानाबादेत कोरोनाचे नवीन तीन रुग्ण

sakal_logo
By
तानाजी जाधवर

उस्मानाबाद : जिल्ह्यात आणखी तीन जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. हे तिन्ही रुग्ण कळंब तालुक्यातील असून, यात एका महिलेचा समावेश आहे.

कळंब तालुक्यातील पाथर्डी गावातील दाम्पत्यासह महसूल विभागाच्या एका कर्मचाऱ्यास बाधा झाल्याची माहिती आहे. या तिन्ही जणांचे स्वॅब नमुने बुधवारी (ता. १३) सायंकाळी तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. गुरुवारी (ता. १४) सायंकाळी त्यांचे अहवाल प्राप्त झाले असून, तिघांनाही कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे. यापैकी पाथर्डीतील दाम्पत्य हे मुंबईवरुन परतल्याची माहिती आहे. त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. तसेच महसुल विभागाच्या एका कर्मचाऱ्‍यालाही कोरोनाची लागन झाल्याची माहिती आहे.

जिल्ह्यामध्ये दोन व तीन एप्रिल रोजी तीन जण कोरोना पॉझीटिव्ह आढळले होते. उमरगा भागातीलच हे तिन्ही रुग्ण होते. जिल्ह्याच्या इतर भागांमध्ये सुदैवाने कोरोनाचा फैलाव झालेला नव्हता. शिवाय हे तीनही रुग्ण बरे होऊन घरी परतल्यानंतर गेल्या ३८ दिवसांत जिल्ह्यामध्ये कोरोनाचा रुग्ण आढळला नव्हता. त्यामुळे जिल्हा ग्रीन झोनमध्ये आला होता.

हेही वाचा : चार जवानांपुढे कोरोना सरेंडर

मात्र सोमवारी (ता. ११) परंडा तालुक्यातील एका युवकाचा अहवाला कोरोना पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले. परंडा तालुक्यातील सरणवाडी येथील एका युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे सोमवारी सायंकाळी निष्पन्न झाले होते. रविवारी (ता. १०) परंडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या या युवकाचे स्वॅब नमुने तपासणीसाठी लातूर येथील वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविण्यात आले होते.

सोमवारी सायंकाळी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यामध्ये ३८ दिवसांनंतर कोरोनाचा नवीन रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. 
मुंबई, पुणे येथे प्रवास केलेल्या परंडा तालुक्यातील सरणवाडी येथील तीसवर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाली असून, त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्याने शेतातील कलिंगड व खरबुजाची वाशी व नवी मुंबई येथे विक्री केली होती.

दरम्यान, कोरोनाबाधित युवकाच्या कुटुंबातील सहा जणांचे स्वॅब नमुने निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे उस्मानाबादकरांना दिलासा मिळाला असतानाच कळंब तालुक्यात तीन जणांना कोरोनाची बाधा झाल्याने चिंता वाढली आहे.