चिमुकल्यांना कडेवर घेत त्यांची पायपीट सुरुच

अविनाश काळे
Wednesday, 1 April 2020

मुंबइहून सात दिवसांपूर्वी निघालेल्या मजुरांच्या कुटुंबीयांना गाव गाठण्याची आस लागली आहे. मात्र २६ मार्चला मुंबइतून निघालेल्या या २५ जणांचा पायी प्रवास सुरु आहे.

उमरगा (जि. उस्मानाबाद) : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प झाली अन्‌ उदरनिर्वाहासाठी मुंबई सारख्या मोठ्या शहरात आलेल्या गोरगरीब कुटुंबाची चांगलीच दैना उडाली.

शहरात काम नसल्याने गावाकडे निघालेल्या मजुरांच्या कुटुंबावर वाहतूक बंद असल्याने चक्क पायी प्रवासाची वेळ आली. कमलापूर (जि. गुलबर्गा, कर्नाटक) परिसरातील कमलाबाई राठोड यांच्यासह २५ जण मुंबईहून जवळपास ६५० किलोमीटर अंतर कापत गावाकडे निघाले आहेत.

वाचा : पोलिसांनी दिले त्याला डॉक्टरांच्या ताब्यात, कोरोना बाधितांच्या संपर्कात आला होता

कमलापूरसह आजुबाजुच्या तांड्यातील जवळपास २५ ते ३० जणांचा समुह मुंबई येथे गेल्या सात ते आठ वर्षांपासून रस्ते बांधणीच्या कामावर मजूर म्हणून काम करीत होते. कोरोनाचा संसर्ग सर्वांना धावपळीचा ठरला. लॉकडाऊनमुळे २४ तास धावणारी मुंबई बंद पडली अन्‌ गरिब कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. अशा कठीण परिस्थितीत गावाकडे जाण्यासाठी वाहन नसल्याने मजूराच्या कुटुंबियांनी पायी जाण्याचा निर्णय घेतला.

२६ मार्चपासून त्यांचा प्रवास सुरू झाला, प्रवासाच्या दरम्यान येणाऱ्या अनेक गावांतील लोकांनी त्यांच्यासाठी अन्नपाण्याची सोय केली. २५ ते २० लोकांच्या या समूहात तीन ते आठ वर्षांची अनेक लहान मुले आहेत. त्यांच्यावरही पायी जाण्याची वेळ आली. 

हुमनाबादच्या २० जणांचाही पायी प्रवास 
मोलमजूरीसाठी बोरिवली (मुंबई) येथे राहणाऱ्या कर्नाटकातील हुमनाबाद तालुक्यातील जणांचा प्रवासही विदारक परिस्थितीतून सुरू झाला. बोरिवली येथून आठ दिवसांपूर्वी निघालेले पुरुष, महिला बुधवारी (ता. एक) सायंकाळी सहा वाजता उमरगा शहरात पोचले. येथून हुमनाबाद साठ किलोमीटरवर असल्याने एकत्रितपणे सर्व जण मोठ्या लगबगीने गावाकडे जात होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad Workers' Families Are Expected To Reach The Village