जिल्हाबंदीची हवी काटेकोर अंमलबजावणी, इतर जिल्ह्यातून सर्रास वाहने लातूर शहरात

सुशांत सांगवे
सोमवार, 6 एप्रिल 2020

‘कोरोना’चा फैलाव होऊ नये म्हणून सरकारने जिल्हाबंदी जाहीर केली असली तरी या आदेशाची राज्यात काटेकोरपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही. केवळ या एकाच कारणामुळे लातूर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यानंतरही जिल्हाबंदीबाबत हेच चित्र पाहायला मिळत आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहने लातूरात सर्रास प्रवेश करत आहेत. पोलिसांकडे मनुष्यबळाची कमतरता असल्याने सद्यःस्थितीत नागरिकांनीच गांभीर्याने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.

लातूर : ‘कोरोना’चा फैलाव होऊ नये म्हणून सरकारने जिल्हाबंदी जाहीर केली असली तरी या आदेशाची राज्यात काटेकोरपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही. केवळ या एकाच कारणामुळे लातूर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यानंतरही जिल्हाबंदीबाबत हेच चित्र पाहायला मिळत आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहने लातूरात सर्रास प्रवेश करत आहेत. पोलिसांकडे मनुष्यबळाची कमतरता असल्याने सद्यःस्थितीत नागरिकांनीच गांभीर्याने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.

‘कोरोना’चा मराठवाड्यात शिरकाव झाला आहे. औरंगाबाद, उस्मानाबाद, हिंगोली, लातूर या शहरानंतर आता जालन्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे चिंतेचे वातावरण दिवसेंदिवस वाढत आहे. अशा स्थितीत अधिक दक्षता घेणे, घराबाहेर न पडणे, लांबचे प्रवास टाळणे गरजेचे बनले आहे. राज्य सरकारनेही आधीच जिल्हाबंदी जाहीर केली आहे. त्यामुळे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात कोणालाही जाता येत नाही. असे असले तरी अजूनही नांदेड, उस्मानाबादसह इतर जिल्ह्यातून लातूरात वाहने येत आहेत. वाहनचालक वेगवेगळ्या मार्गांचाही वापर करताना दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.

वाचा ः उदगीर, जळकोट, रोहिण्यात वादळी वाऱ्यासह पाऊस

पोलिसांकडे लातूर जिल्ह्यात अडीच हजारापर्यंत मनुष्यबळ आहे. एकीकडे मनुष्यबळाचा तुटवडा आहे तर दुसरीकडे पोलिसांचे कामाचे तास वाढले आहेत. पोलिसांच्या रजा रद्द झाल्या आहेत. रात्रंदिवस त्यांना घराबाहेर रहावे लागत आहे. लोकांनी घराबाहेर पडू नये म्हणून चौकाचौकात उभे राहण्यापासून गल्लोगल्ली गस्त घालण्यापर्यंत, शासकीय रुग्णालयातील बंदोबस्तापासून नाकाबंदीपर्यंत अशी विविध कामे दैनंदिन कामकाज सांभाळत पोलिसांना करावी लागत आहेत. त्यामुळे पोलिसांवरील ताण वाढत चालला आहे. अशा स्थितीत नागरिकांनीच अधिक दक्ष राहून विनाकारण प्रवास करणे टाळले पाहीजे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

आणखी ६०० गृहरक्षक मिळावेत
कोरोनामुळे पोलिसांवरचा ताण वाढला आहे. उपलब्ध मनुष्यबळ अपूरे पडत आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी १०० गृहरक्षकांची मदत पोलिसांनी घेतली आहे. पण कामाचा व्याप वाढत असल्याने ही मदत अपूरी पडत आहे. म्हणून मदतीसाठी आणखी ६०० गृहरक्षक मिळावेत, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Other Districts Vehicles Enter Latur, Police Number Not Enough