बीड - मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण केल्यानंतर त्यांना झालेली मारहाण ही कौर्याची परिसिमा पार करणारी होती. आरोपी कौर्यकृत्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी संतोष देशमुख यांच्यासोबत घृणास्पद कृत्य करुन त्याचा असुरी आनंदही घेतला. याबाबतचे फोटो समोर येताच जिल्ह्यात संतापाची लाट उसळली.
या संतापामुळेच सोमवारी रात्री उशिरा बंदची घोषणा करुन मंगळवारी (ता. चार) जिल्ह्यात बंद पाळण्यात आला. आठवडी बाजारपेठांच्या गावांत देखील बंद पाळण्यात आला. परळी व माजलगाव वगळता उर्वरित जिल्ह्यात बंदला मोठा प्रतिसाद मिळाला.
ता. नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांचे अपहरण करुन हत्या करण्यात आली. वाल्मीक कराडने अवादा कंपनीला मागीतलेल्या दोन कोटी रुपयांच्या खंडणीला आड आल्यानेच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखालील विशेष तपास पथकाच्या तपासातून समोर आले.
खुन, खंडणी व अॅट्रॉसिटी या तीन गुन्ह्यांतचा तपास केल्यानंतर या गुन्ह्यांची साखळी खंडणी व त्यातूनच खुन झाल्याचे उघड झाले. दरम्यान, विशेष तपास पथकाने न्यायालयात दाखल केलेल्या दिड हजार पानांच्या दोषारोपत्रासोबत काही पुरावेही जोडले. या पुराव्यांत डिजीटल पुराव्यांमध्ये संतोष देशमुख यांना मारहाणीच्या व्हिडीओ चित्रणाचे स्क्रीनशॉट जोडण्यात आले. याचे फोटो समोर येताच संतापाची सर्वत्र लाट उसळली.
दरम्यान, सकाळी लवकरच उपचार घेत असलेले मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील मस्साजोगला दाखल झाले. त्यांनी देशमुख कुटूंबियांची भेट घेत धीर दिला. बीडमध्ये तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकातून दुचाकी फेरी काढून बंदचे आवाहन केले. त्यानंतर दुकाने, बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या.
वैद्यकीय सेवांसह इतर अत्यावश्यक सेवा, वाहतूक, शाळा, महाविद्यालये हातगाड्यांवरील व्यवसाय सोडता पुर्णपणे बंद पाळण्यात आला. अंबाजोगाई, केज, माजलगाव, वडवणी, धारुर, शिरुर कासार, पाटोदा, आष्टी व गेवराईतही बंद पाळण्यात आला. राज्य मार्ग व महामार्गांवरील हॉटेलही बंद दिसून आले. शहरांमध्ये दुचाकींवर फेऱ्या काढण्यात आल्या.
पवार, मुंडेंच्या छायाचित्रांच्या बॅनरचे दहन
दरम्यान, केजमध्ये उपममुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या छायाचित्रांचे बॅनर आणि टायर जाळून देशमुख यांच्या चाहत्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या.
आरोपींचे फोटो मुत्रालयात
दरम्यान, केज व बीडमध्ये या घटनेतील आरोपी वाल्मीक कराड, विष्णू चाटे, जयराम चाटे, सुदर्शन घुले, प्रतिक घुले, सुदर्शन सांगळे यांचे फोटो मुत्रालयांत लावण्यात आले. त्यावर लघू शंका करुनही या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.
ठेचून मारा, आम्ही न्याय करु; नेटकरी संतापले
संतोष देशमुख यांच्यासोबत कौर्यकृत्य व घृणास्पद कृत्य करणाऱ्या सुदर्शन घुले, प्रतिक घुले, जयराम चाटे, सुधीर सांगळे, महेश केदार यांचे सदर फोटो सोमवारी (ता. तीन) उशिरा समोर आल्यानंतर पुन्हा एकदा सर्वत्र संतापाची लाट उसळली. आरोपींना सोडा आम्ही न्याय करु, आरोपींना ठेचून मारा, आरेापींचे समर्थन करणाऱ्यांनो डोळे उघडून बघा, अशा संतप्त प्रतिक्रिया सोशल मिडीयावर उमटत होत्या.
- बाजारपेठा ओस, अत्यावश्यक सोडता उर्वरित बंद
- बीड, धारुर, केज, वडवणी दुचाकी फेरी काढून बंदचे आवाहन
- चौकाचौकांत कार्यकर्ते जमून निषेध घोषणा
- मनोज जरांगे पाटलांनी घेतली देशमुख कुटूंबियांची भेट
- परळी, माजलगावला बाजारपेठा सुरळीत
- आठवडी बाजारपेठांच्या गावांतही बंद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.