परभणी जिल्ह्याभरात नऊ हजाराच्यावर उमेदवार रिंगणात

गणेश पांडे
Thursday, 7 January 2021

जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील 566 ग्रामपंचायतीमधील चार हजार 300 जागेसाठी तब्बल नऊ हजाराच्यावर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

परभणी ः राजकीय क्षेत्रात नशीब आजमवणाऱ्या तरुण नेत्याच्या राजकीय क्षेत्राची सुरुवात ही सहसा ग्रामपंचायत निवडणुकीपासून सुरु होत असते. सध्या जिल्ह्यात ग्रापंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु झाली आहे. जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील 566 ग्रामपंचायतीमधील चार हजार 300 जागेसाठी तब्बल नऊ हजाराच्यावर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे गावपातळीवरील राजकारण कमालीचे तापले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

परभणी जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमुळे ग्रामीण भागात वातावरण जोरदार तापले आहे. छोट्या- छोट्या गावातूनही जिल्हास्तरावर काम करणारे नेते मंडळी ठाण मांडूण बसली आहेत. त्यामुळे गावातील कार्यकर्त्यामध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे. प्रभागातील कामाचा लेखा जोखा मांडून आपणच कसे कर्तबगार आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न प्रत्येक उमेदवार व पॅनल प्रमुखांकडून केला जात आहे. ऐरवी दुपारी व रात्रीच्यावेळी ओस पडणाऱ्या गावातील गल्लीबोळातून आता गप्पाचे फड रंगतांना दिसत आहेत. कुठे कॉर्नर सभा तर कुठे भेटीसाठी काढण्यात आलेली रॅली ही गावातील चर्चेचा विषय ठरत आहे. जिल्ह्यात एकूण 566 ग्रामपंचायतीची निवडणुक सुरु आहे. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अर्ज मागे घेण्यासाठी देखील उमेदवारांची लगबग दिसून आली. 566 ग्रामपंचायतीमधील दोन हजार 39 प्रभागासाठी व चार हजार 300 सदस्य निवडले जाणार आहेत.

हेही वाचाट्रॅक्टरच्या ट्रेलरमध्ये कार येऊन धडकल्याने कारमधील पती-पत्नी जागीच ठार झाले आहेत

यात परभणी तालुक्यातील 88 ग्रामपंचायतीसाठी 736, सेूल तालुक्यातील 67 ग्रामपंचायतीसाठी 519, जिंतूर तालुक्यातील 101 ग्रामपंचायतीसाठी 809, पाथरी तालुक्यातील 42 ग्रामपंचायतीसाठी 370, मानवत तालुक्यातील 41 ग्रामपंचायतीसाठी 339, सोनपेठ तालुक्यातील 39 ग्रामपंचायतीसाठी 329, गंगाखेड तालुक्यातील 70 ग्रामपंचायतीसाठी 222, पालम तालुक्यातील 53 ग्रामपंचायतीसाठी 435 तर पूर्णा तालुक्यातील 65 ग्रामपंचायतीसाठी 541 सदस्य निवडून येणार आहेत.

नऊ तालुक्यात नऊ हजार पाच उमेदवार रिंगणात

अर्ज मागे घेण्याच्या दिवशी नऊ तालुक्यातील तीन हजार 324 उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत आपले उमेदवारी अर्ज परत घेतले. त्यामुळे आता चार हजार 300 सदस्यांसाठी तब्बल नऊ हजार पाच उमेदवारांचे अर्ज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात परभणी (1437), सेलू (900), जिंतूर (1705), पाथरी (676), मानवत (714), सोनपेठ (673), गंगाखेड (1082), पालम (830) व पूर्णा (988) असे उमेदवार निवडणुक लढवित आहेत.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Over nine thousand candidates are in the fray in Parbhani district