esakal | पपईने शेतकऱ्यांच्या आयुष्यात ‘गोडवा’
sakal

बोलून बातमी शोधा

latur

पपईने शेतकऱ्यांच्या आयुष्यात ‘गोडवा’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उमरगा : गेल्यावर्षी जून महिन्यात पपईचे उत्पन्न सुरू झाले. मात्र, अडीच महिन्याच्या लॉकडाउनमध्ये बाजारपेठेचा व्यवहार बंद असल्याने पपई शेतातच सडली होती. मात्र, यंदा पपईचे दर शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहेत. तालुक्यातील कोराळ येथील प्रगतिशीर शेतकरी परमेश्वर जाधव यांनी मोठ्या मेहनतीने पिकविलेल्या तीन एकर पपईच्या बागेतील मालाचा उठाव मुंबईच्या बाजारपेठ होत असून, त्यांना आतापर्यंत २१ टन विक्रीतून तीन लाख मिळाले आहेत. त्यामुळे जणू त्यांच्या आयुष्यात गोडवा आला आहे.

श्री. जाधव यांनी दोन लाख दहा खर्च करून तीन एकर क्षेत्रात पपईची बाग फुलवली. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या पपईच्या झाडाला फळधारणाही चांगली झाली. जुलै महिन्यापासून आतापर्यंत सात तोडी झाल्या असून, २१ टन पपई काढण्यात आली. सोलापूरचे व्यापारी शेतात जागेवर खरेदी करून तो माल मुंबईच्या बाजारपेठेत पाठवत आहेत.

चार वर्षांपासून घेतात उत्पन्न

श्री. जाधव चार वर्षांपासून पपईचे उत्पन्न घेत आहेत. वर्ष २०१८ मध्ये प्रति किलो वीस ते बावीस रुपये दर मिळाला होता. मात्र, वर्ष २०२० मध्ये कोरोनामुळे बाजारपेठ ठप्प होती. लॉकडाउनमुळे निच्चांकी दर मिळाला. मुंबई, पुणेच्या व्यापाऱ्याने आठ ते दहा रुपये प्रमाणे मागणी केली होती. मात्र, पॅकिंग व वाहतूक खर्च स्वतः करावयाचा असल्याने अधिक फायदा मिळणे शक्य नव्हते. लातूरच्या व्यापाऱ्याने जागेवर पाच रुपये किलो प्रमाणे दराने खरेदी केली. नुकसान सहन करुन श्री. जाधव यांनी बाग मोडली. परंतु, पुन्हा नव्या जोमाने २२ नोव्हेंबर २०२० ला तीन एकर क्षेत्रात पपईची लागवड केली. चार जुलैपासून प्रत्यक्ष बाजारपेठेत माल पाठविला जात आहे. प्रारंभी अकरा रुपये किलो दर मिळाला, मध्यंतरी पंधरा रुपये दर मिळाला. सध्या दरात थोडी घसरण झाली असून, १४ रुपये दर मिळत आहे. आतापर्यंत २१ टन मालाच्या विक्रीतून तीन लाखाची विक्री झाली आहे. आणखी जवळपास साठ टन उत्पादनाची अपेक्षा आहे.

गतवर्षी पाच एकर क्षेत्रातील पपई कोरोना संसर्गाच्या विळख्यात अडकली. पपईला डंक बसला नाही. मात्र, लॉकडाउनमुळे बाजारपेठा ठप्प झाल्याने मोठा आर्थिक फटका बसला; तरीही डगमगलो नाही. परिस्थिती बदलेल या अपेक्षेने पुन्हा तीन एकर क्षेत्रात पपईची लागवड केली. सध्या दर अपेक्षेप्रमाणे चांगला नसला तरी परवडणारा आहे.

- परमेश्वर जाधव, कोराळ

loading image
go to top