
परभणी : ९ ऑगस्ट क्रांतीदिनानिमित्त शहरातील क्रीडा संकुलात तिरंगा हातात घेऊन, राष्ट्रध्वजाच्या तीन रंगाचे पेहराव घालून आलेल्या १५ हजारांवर विद्यार्थ्यांनी सामूहिकरीत्या गायलेले राष्ट्रगीत अंगावर शहारे आणणारे ठरले. क्रीडा संकुलाचा संपूर्ण परिसर केशरी, पांढरा व हिरव्या रंगांनी व्यापून गेला होता.
जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या वतीने क्रांतिदिनी या आगळ्या वेगळ्या सोहळ्याचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुलात मंगळवारी (ता. नऊ) करण्यात आले होते.
क्रांती दिनाच्या चले जाव चळवळीच्या स्मृतींना जागविण्यासाठी व देशभक्तीचे स्फुल्लिंग नव्याने चेतवण्यासाठी शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी हातात तिरंगी झेंडे घेऊन प्रभात फेरी काढून संकुलात एकत्र आले होते. पावसाची तमा न बाळगता देशभक्तिपर घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले होते. १५ हजार विद्यार्थ्यांनी केलेली मानवी साखळी एकात्मतेचा, अखंडतेचा संदेश देणारी ठरली. जिल्हा क्रीडा संकुलात बाल विद्या मंदिरच्या विद्यार्थिनींनी तिरंगा गीताचे सादरीकरण केले. सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी भारत देशाचा नकाशा निर्माण करून गीताचे सादरीकरण केले.
यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल, मुख्यकार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, मनपा आयुक्त देविदास पवार, जिल्हा प्रकल्प अधिकारी रश्मी खांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपमुख्यकार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, संदीप घोन्सीकर, शिक्षणाधिकारी (मा) आशा गरूड, जिल्हा क्रिडा अधिकारी नरेंद्र पवार आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमासाठी उपशिक्षणाधिकारी गणराज यरमळ, गटशिक्षणाधिकारी मंगेश नरवाडे, विस्तार अधिकारी गोविंद मोरे, मधुकर उमरीकर, बजरंग ठाकूर, भारत शहाणे, क्रिडा शिक्षक कैलास माने, सुशिल देशमुख, रणजित काकडे, कैलास टेहरे, नवनीत देशमुख आदींनी पुढाकार घेतला होता.