Parbhani Breaking ; साठ वर्षीय इसमास कोरोनाची बाधा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 29 May 2020

परभणी जिल्ह्यात सध्या दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. यातच मागील तीन  दिवसांपूर्वी एकदाच ३१ रुग्ण वाढल्यानंतर दोन दिवस स्वॅबचे अहवाल प्रलंबित राहिले तेवढाच दिलासा परभणीकरांना मिळाला. पुन्हा शुक्रवारी एका ६० वर्षीय इसमास कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल हाती आला आहे.  

परभणी, ः वाघी बोबडे (ता.जिंतूर) येथील मुंबईहून परतलेल्या एका ६० वर्षीय इसमाला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती स्वॅब अहवालात स्पष्ट झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा आता ६८ वर गेला आहे.

परभणी जिल्ह्यात मुंबई येथील पनवेलमधून हा व्यक्ती त्याच्या कुटूंबियासह (ता.१५) मे रोजी दुपारी वाघी बोबडे (ता.जिंतूर) येथे आला होता. बुधवारी (ता.२७) त्यांना प्रकृती अस्वास्थामुळे परभणीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतू, त्यानंतर त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांची तपासणी करून त्यांचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. 

हेही वाचा - मराठवाड्याच्या भुमिपुत्राकडून परभणीला मोठ्या अपेक्षा

मुंबईहून चार जण परतले होते
शुक्रवारी (ता.२९) दुपारी या स्वॅब तपासणीचा अहवाल जिल्हा शासकीय रुग्णालयास प्राप्त झाला. त्यात ते पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. दरम्यान, कोरोना बाधित व्यक्तीसोबत मुंबईहून त्यांची पत्नी, मुलगा इतर एक जण असे चार व्यक्ती आले होते. त्यातील मुलगा व गाडीचालक परत मुंबईला निघून गेले.

हेही वाचा - Video - रोग प्रतिकारकशक्ती कशी होते कमी? ते, वाचाच

आयुक्तांनी घेतला प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा
परभणी : महापालिकेचे आयुक्त देविदास पवार यांनी गुरुवारी (ता. २८) घेतलेल्या सर्व विभागप्रमुख, डॉक्टर यांच्या बैठकीत कोरोनाचा प्रतिबंध, उपाययोजना व आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेतला. दरम्यान, त्यांनी शहरातील विविध ठिकाणच्या विलगीकरण केंद्रांना भेटी देऊन व्यवस्थेची पाहणी केली. महापालिकेत झालेल्या या बैठकीत आयुक्त श्री. पवार यांनी संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवलेल्या संशयित रुग्णांच्या सुविधांचा आढावा घेऊन तेथे प्रमुखांच्या नियुक्त्या केल्या. या इमारतीमध्ये पिण्याच्या पाण्याची, सांडपाणी, स्वच्छता, सॅनिटायझर व्यवस्थेकडे कटाक्षाने लक्ष देण्यास सांगितले. सहायक आयुक्त शिवाजी सरनाईक, संतोष वाघमारे, सुधाकर किंगरे, अल्केश देशमुख, मुंतजिबखान, करण गायकवाड यांची त्या ठिकाणी नेमणूक केली. होम क्वारंटाइन केल्यानंतर नागरिक फिरू शकतात, त्यांनी घरात राहावे यासाठी त्या परिसरात सहायक आयुक्त, आरोग्य विभागातील कमर्चाऱ्यांनी भेटी द्याव्यात. शहरातील मुख्य चेकपोस्ट गंगाखेड रोड, पाथरी रोड, वसमत रोड या ठिकाणी बाहेरगावांहून येणाऱ्यांची माहिती घ्यावी. ज्या परिसरात रुग्ण आढळले, त्या परिसरातील नातेवाइकांची माहिती घेण्यात यावी, परिसर क्वारंटाइन केल्यानंतर त्या परिसरात बाहेरच्या व्यक्तीला फिरू देऊ नये, लोकप्रतिनिधींचे सहकार्य घ्यावे, पत्राने परिसर सील करावा, प्रभागाततील ५० वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या व्यक्तींना भेटी देत ताप, खोकला, रक्तदाब, मधुमेह आदी आजारांची माहिती घ्यावी आदी सूचना श्री. पवार यांनी दिल्या. 

परभणी कोरोना मिटर
एकूण रुग्ण - ६८
उपचार सुरु - ६६
घरी सोडले - एक
मृत्यु - एक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parbhani Breaking; Sixty-Year-Old Man Corona Barrier, parbhani news