अग्नीशमनच्या भरवशावरच परभणी बसस्थानक

भास्कर लांडे
शुक्रवार, 31 मे 2019

बसची आग शमविण्यासाठी निदान सिसफायर तरी उपलब्ध असते, परंतु बसस्थानक अथवा बसडेपोत त्याचाही पत्ता नाही. म्हणजेच अग्नीशमन दलाच्या भरवशावरच राज्य परिवहन विभाग असून त्यांच्याकडे आग शमविण्यासाठी स्वतःची कुठलीही यंत्रणा उपलब्ध नाही.

परभणी : बसची आग शमविण्यासाठी निदान सिसफायर तरी उपलब्ध असते, परंतु बसस्थानक अथवा बसडेपोत त्याचाही पत्ता नाही. म्हणजेच अग्नीशमन दलाच्या भरवशावरच राज्य परिवहन विभाग असून त्यांच्याकडे आग शमविण्यासाठी स्वतःची कुठलीही यंत्रणा उपलब्ध नाही. त्याहीपेक्षा मागील कित्येक वर्षांपासून बसस्थानकाचे फायर ऑडीटही झाले नसल्याने स्थानकांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे समोर आले आहे. 

दोन दिवसांपूर्वी बीड-किनवट (एमएच-२० बीएल- १९०६) बसला परभणी बसस्थानकात आग लागल्याने फायर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. अधिक खोलात गेल्यावर राज्य परिवहन महामंडळ आगीच्याबाबतीत जराही गंभीर नसल्याचे दिसून आले. मंगळवारी (ता. २८) बसची आग शमविण्यासाठी सीसफायरशिवाय दुसरे कोणतेही उपकरण नव्हते. प्रवाशांनी वाळू, पिण्याचे पाणी, मातीचा वापर करावा लागला. जर त्याने आग नियंत्रणात आली नसल्यास पुढील अनर्थाची कल्पनाही करता येत नव्हती. दुर्दैवाने आगामी काळात आगीची एखादी घटना घडल्यास त्यावर नियंत्रण कसे आणता येईल, याचे कसेलेही उत्तर परभणी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे नाही.

उल्लेखनीय म्हणजे विभागीय कार्यालय, विभागीय वर्कशॉप, परभणी बसस्थानक आणि त्यांचा डेपो, या चारही ठिकाणी सिसफायर देखील उलब्ध नाहीत. येथील ठिकाणी कित्येक बसेस उभा असतात. वर्कशॉपमध्ये बसेची वेल्डींग करण्यासाठी आगीसोबत काम सुरू असते. तेव्हा इतर उपकरणांना आग लागल्यास ती शमविण्याऐवजी पाहत बसण्याशिवाय अधिकारी, कर्मचा-यांकडे पर्याय नाही. निदान पाणीही उपलब्ध नाही. बसस्थानकात पाण्याचे दुर्भिक्ष असून विकतच्या पाण्यावर प्रवाशांना तहान भागवावी लागते. मग आग शमविण्यासाठी पाणी कोठून आणणार हा प्रश्न आहे. तेव्हा अग्नीशमन दलाची गाडी येईपर्यंत वाट पाहत बसावी लागणार आहे. तोपर्यंत आगीच्या भक्षस्थानी काय, काय सापडेल, याच नेम नाही. तरीही एकाही कार्यालयाचे फायर ऑडीट झालेले नाही. मुळात परिवहन विभागाच्या बसस्थानक व डेपोला हा शब्दच माहीत नाही. म्हणून त्यांनीही स्वतःहून फायर ऑडीट केलेले नाही. ते केव्हा होईल, हे सांगताही येत नाही. त्यामुळे बसस्थानक आगीपासून जराही सुरक्षित नाही.  

शस्त्राविना योद्धे परभणी  विभागाकडे सुरक्षा विभाग कार्यरत असल्याचे सांगितले जाते. दुर्दैवाने एखादी घटना घडल्यास ते कशाने आग शमविणार, हे मात्र कोणीही सांगण्यास तयार नाही. शिवाय, परभणी बसस्थानकात एकही सिसफायर पाहावयास मिळाले नाही. म्हणजे एसटीची सुरक्षा शाखा, ही यंत्रणा कागदी घोडेच म्हणावे लागतील. 

बसस्थानकाचे फायर ऑडीट करण्यासाठी एका महिन्यापूर्वी मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयाकडे परवानगी मागितली आहे. त्याचे उत्तर अद्याप आलेले नाही. तरीही आमच्याकडे सुरक्षा विभाग कार्यारत असून त्यांना वारंवार प्रशिक्षण व प्रात्यक्षिके घेत असतोत.
- जा.ना. शिरसाट, विभागीय नियंत्रक, परभणी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: parbhani bus stand is still depends on fire brigade