esakal | परभणीत बाहेरगावाहून येताय; मग व्हावे लागणार होम क्वारंटाइन, अन्यथा...
sakal

बोलून बातमी शोधा

mohim

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या दृष्टीने बाहेरून येणाऱ्या नागरिकांनी स्वतःहून होम क्वारंटाइन व्हावे असे आवाहन आयुक्त देविदास पवार यांनी केले आहे. असे न केल्यास महापालिका गुन्हा दाखल करणार आहे. याकरिता तपासणीसाठी नाक्यांवर पथक तैनात करण्यात आले आहेत. परभणीत बापू सेवाभावी संस्थेच्या वतीने शहरातील नाक्यांवर तपासणी पथके नागरिकांची तपासणी करीत आहेत.

परभणीत बाहेरगावाहून येताय; मग व्हावे लागणार होम क्वारंटाइन, अन्यथा...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परभणी : शहरात बाहेरून येणाऱ्या नागरिकांनी स्वतः होम क्वारंटाइन व्हावे, अन्यथा गुन्हा दाखल करू, असा इशारा महापालिकेचे आयुक्त देविदास पवार यांनी दिला आहे. 

राज्यात तसेच शहरात लॉकडाउन झाल्यानंतर अधिकृतपेक्षा अनधिकृतपणे येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी होती. अशाच मार्गाने आलेल्या अनेक नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्या व्यक्तीमुळे त्याच्या कुटुंबातील तसेच संपर्कातील अनेक जण संक्रमित झाले आहेत. ज्यावेळेस येण्यास करत प्रतिबंध करण्याची गरज होती त्यावेळेस मात्र ते करण्यात फारसे स्वारस्य यंत्रणेने दाखवले नव्हते. परंतू, आता कोरोना समाजामध्ये संक्रमित होत असून दररोज कोरोना संक्रमित रुग्ण आढळून येत आहेत. प्रशासनाला वारंवार संचारबंदी लावावी लागत असून प्रतिबंधित क्षेत्रातही वाढ होत आहे.

हेही वाचा - Corona Update : कोरोनाचा पाश घट्ट, औरंगाबादेत आज पुन्हा २०० बाधित, ऍक्टिव्ह रुग्ण तीन हजारांच्या घरात

बापू सेवाभावी संस्थेचा पुढाकार
खानापूर फाटा येथील बापू सेवाभावी संस्था व महापालिकेच्या वतीने शहरात येणाऱ्या मुख्य रस्त्यावर आता बाहेरून येणाऱ्या नागरिकांची तपासणी होणार आहे. वसमत रस्त्यावर खानापूर फाटा, जिंतूर-पाथरी रस्त्यावर, विसावा कॉर्नर व गंगाखेड नाका परिसरात ही पथके तैनात करण्यात आली असून बाहेरून येणाऱ्या व्यक्तींची माहिती घेतल्या जात आहे. अशा नागरिकांनी स्वतःच स्वतःला १४ दिवसांसाठी होम क्वारंटाइन करून घ्यावे अन्यथा त्यांना इन्स्टिटयुशनल क्वारंटाइन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा - हिंगोलीत उभारली जाणार सुंदर शिल्पे

परभणीत संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरू
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परभणी शहरात गुरुवारी (ता.दोन) पासून लागू करण्यात आलेल्या संचारबंदीची अंमलबजावणी अत्यंत कडक पध्दतीने केली जात आहे. सहायक पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांच्यासह शहरातील तिन्ही पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व कर्मचारी शहरात कर्तव्यावर हजर आहेत. परभणीत गुरुवारी (ता.दोन) कोरोनाचा संसर्ग झालेले पाच रुग्ण आढळून आले आहेत. या आधी सलग तीन दिवसांपासून जिल्ह्यात व विशेषत: परभणी शहरात कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले आहेत. सध्या जिल्ह्यातील १२३ नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यातील ९४ जण तंदुरुस्त होवून घरी परतले आहेत. परंतू, अचानक जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णामध्ये वाढ होत असल्याने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी परभणी शहरासह तालुक्याच्या ठिकाणी तीन दिवसांची संचारबंदी लागू केली. त्यामुळे शहरात कुणालाही बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे.