esakal | परभणी जिल्हा ओलाचिंब, धरणे भरली, पिकांना फटका
sakal

बोलून बातमी शोधा

yeldari

पूर्णा तालुक्यातील आडगाव लासिना व गौर येथे ढगफुटीसारखा पाऊस पडल्याने फुटक्या पत्राच्या छिद्रातुन भिंतीमध्ये पाणी झिरपुन मातीचा फुगवटा होउन घरांची पडझड झाली. तर ब्राम्हणगाव (ता.सेलू) शिवारातील शेतात दुधना नदीच्या पुराचे पाणी शिरल्याने सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले. तसेच लोअर दूधना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी सकाळपासूनच जोरदार पाऊस पडत असल्यामूळे धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले. 

परभणी जिल्हा ओलाचिंब, धरणे भरली, पिकांना फटका

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः जिल्ह्यात पावसाने सर्वदुर मुक्काम ठोकला आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने जिल्हा सुखावून गेला आहे. काही तालुक्यात थोड्या अधिक प्रमाणात नुकसानीच्या बातम्या जरी असल्या तरी आगामी काळासाठी हा पाऊस निश्चित फलदायी ठरणार आहे. 

येलदरीचे दहा गेट उघडले, २९ हजार ४८०.५२ क्युसेक विसर्ग 
जिंतूर ः पुर्णा पाटबंधारे विभागाच्या जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणाचे शनिवारी (ता.१९) मध्यरात्री सर्व म्हणजे दहाही दरवाजे उघडण्यात आले. यापैकी चार दरवाजे एक मीटर आणि सहा दरवाजे अर्धा मीटरने उघडले असून २९ हजार ४८०.५२ क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला. येलदरी धरणाच्या जलाशयाच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्याने शनिवारी मध्यरात्री धरणाचे दहाही दरवाजे अर्धा मीटर उघडून वीजनिर्मितीसह २१ हजार १००.४० क्युसेक विसर्ग सोडण्यात आला होता. परंतू, प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात सतत वाढ होत असल्याने रविवारी (ता.२०) सकाळी एक, पाच, सहा आणि १० क्रमांकाचे दरवाजे प्रत्येकी एक मीटर तर उर्वरित दोन, तीन, चार, सात, आठ व नऊ क्रमांकाचे दरवाजे प्रत्येकी अर्धा मीटर उघडण्यात आले असून त्याद्वारे २९ हजार४८०.५२ क्युसेक तसेच वीजनिर्मिती प्रकल्पाद्वारे २५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. धरणाच्या जलाशयात अजूनही पाण्याची आवक सुरूच असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सावधानता बाळगण्याचा इशारा पूर नियंत्रण कक्षातर्फे देण्यात आला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पातून महिन्यांपासून कमी अधिक प्रमाणात विसर्ग सोडण्यात येत असल्याने येथील धरण तुडूंब भरून पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे कधी दोन, चार, सहा ते कधी दहा याप्रमाणे या कालावधीत धरणाचे अनेकवेळा दरवाजे उघडावे लागले. याअगोदर तीनवेळा दहा दरवाजे उघडावे लागले. धरणाचा एकूण पाणीसाठा ९३४.४४ दशलक्ष घनमीटर (३२.९९ टीएमसी) असून रविवारी (ता.२०) सकाळी सहापर्यंत ८०९.७७० दशलक्ष जीवंत पाणीसाठा उपलब्ध (१०० टक्के) आहे. 

हेही वाचा - आमदार बाबाजानी दुर्रानी यांना जिल्हा बँकेचे संचालक पद पुन्हा बहाल   

दूधना धरणातून दहा हजार ७७६ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग 
सेलू ः लोअर दूधना प्रकल्प धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी सकाळपासूनच जोरदार पाऊस पडत असल्यामूळे रविवारी दूपारी धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले. दहा हजार ७७६ क्युसेस पाणी नदी पात्रात सोडले जात आहे. दूधना धरणात पाण्याची आवक वाढतच असल्यामुळे रविवारी सहा दरवाजे (०.५०) मीटरने उघडण्यात आले. त्यामधून दहा हजार ७७६ क्यूसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. धरणात पाण्याची होणारी आवक पाहता गेट मधून विसर्ग कमी किंवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल असे धरण 
सुत्रांनी सांगितले. तसेच सेलू शहरात दूपारी साडेतीनच्या सुमारास अधूनमधून पावसाच्या सरी कोसळल्या. 

हेही वाचा - परभणी : दुधना धरणाचे चार दरवाजे अर्ध्यामिटरने उघडले

नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याच्या सुचना 
लोअर दुधना प्रकल्प धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अधिक प्रमाणात होत असलेल्या पाऊसामूळे धरणाच्या पाणी पातळी केंव्हाही वाढ होवू शकते.त्यामूळे दूधना नदी पात्रात पाण्याचा विसर्ग यापूढेही मोढ्या प्रमाणात करण्याची वेळ येवू शकते त्यामूळे धरणाच्या पूर नियंत्रण कक्षाच्या वतीने दूधना नदीपात्राच्या काठावरील गावकऱ्यांनी सतर्क रहावे असा इशारा देण्यात आला आहे. 

झरीत सोयाबीन, कापूस पिकांना फटका 
झरी ः झरी परिसरात शानिवार सकाळपासूनच सूर्यदर्शन नव्हते. त्यामुळे पाऊस येण्याचा अंदाज होता. दरम्यान, दुपारी साडेचारच्या सुमारास गेल्या दहा ते पंधरा मिनिटांपासून जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे हा पाऊस कापूस व तूर या पिकासाठी अत्यंत पोषक आहे. रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊन तास धुवांधार पाऊस झाला. या पावसामुळे शेतीमध्ये पाणी साचल्यामुळे याचा फटका सोयाबीनच्या पिकांना बसला आहे. कपाशीच्या सखल भागात पाणी साचल्यामुळे कापूस पिवळा पडण्याची भीती निर्माण झाली 
आहे. अनेक ठिकाणी सोयाबीन शेंगा मोड फुटण्याची प्रक्रिया सुरु झाली असल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

वादळी वाऱ्याने घराची पडझड 
मानवत ः शनिवारी दुपारी तीन वाजता वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस झाला. वादळी वाऱ्याने शहरातील विजेचे खांब जमिनीवर पडले. घरावरील पत्रे उडाली, घराच्या भिंती पडल्या, सखल भागातील घरात पावसाचे पाणी शिरले. यामुळे गोरगरीब नागरिकांच्या घरात पाणी शिरून त्यांचे संसार उघड्यावर आले. वाहनांचेही नुकसान झाले.खरिपातील कापूस, सोयाबीन या मुख्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. 

पावसामुळे घराची पडझड 
पूर्णा ः तालुक्यातील आडगाव लासिना व गौर येथे ढगफुटीसारखा पाऊस पडल्याने फुटक्या पत्राच्या छिद्रातुन भिंतीमध्ये पाणी झिरपुन मातीचा फुगवटा होउन गौर येथील नामदेव आप्पाराव जोगदंड, शंकरराव माणिकराव जोगदंड, आडगाव लासिना येथील गंगाधर विठोबा गौंड घर .नं ६८ यांचे घरे पडले आहेत. ग्रामसेवक राहुल काळे ,ए.आर.लाडेकर, तलाठी विजय राठोड, कविता फाजगे, सरपंच, पोलिस पाटील व गावातील इतर नागरिकांनी पंचनामा करुन प्रशासनाला नुकसान भरपाईची मागणी केली. 

पाथरीतही मोठे नुकसान 
पाथरी : गेल्या तीन चार दिवसांपासून पाथरी तालुक्यात रोजच काही प्रमाणात पाऊस पडत आहे त्यात शुक्रवारी रात्री मुसळधार पावसाने झोडपले हा पाऊस काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत सुरू होता. दुसऱ्या दिवशी शनिवारी संध्याकाळी पुन्हा मुसळधार पाऊस पडला . पावसाने कापूस पीक पिवळे पडत आहे तर काही ठिकाणी झाड आकसून जात असल्याने कापूस पीक हातचे जाते का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत असतांना पुन्हा शनिवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. रामपुरी, खेर्डा, बांदरवाडा, वडी, रेनाखळीस, झरी, देवनाद्रा, पोहेटाकली, बाबूलतार, टाकळगव्हान या शिवारातील शेतजमीन मोठ्या प्रमाणावर पाण्याखाली गेली आहे. तालुक्यातील पोहेटाकळी - मानवत रस्त्यावरील १५ गावांना जोडणारा पुल शनिवारी रात्रीच्या पावसाने वाहून गेला, यामुळे या रस्त्यावरील शेत रस्ते बंद झाले आहेत. 

सेलू-राजेवाडी-वालूर रस्ता बंद.. 
वालूर ः सेलू- निम्न दुधना प्रकल्पाचे चार दरवाजे सकाळी उघडण्यात आले. दुधना नदीचे पात्र भरून वाहत असुन सेलू-वालूर रस्त्यावरील राजेवाडी गावाजवळील दुधना नदीच्या पुलावरून जवळपास चार ते पाच फुट पुराचे पाणी वाहत असल्याने रविवारी काही वेळासाठी सेलू-वालूर मार्गे राजेवाडी रस्ता बंद झाला आहे. तसेच गंगाखड-परभणी रस्त्यावरील खळी पूलावर अनेकांनी पाणी पाहण्यासाठी गर्दी केली होती. 

संपादन ः राजन मंगरुळकर