परभणी : पिक कर्जासाठी शेतकऱ्याचे बँकेत धरणे आंदोलन 

प्रा. डॉ.अंकुश वाघमारे
Friday, 23 October 2020

पावसाळ्याच्या प्रारंभी पावसाने पेरणी पूरक वेळोवेळी हजेरी लावल्यामुळे  उत्साही झालेल्या शेतकऱ्यांनी  बँकेसह खासगी सावकाराचे कर्ज काढून पेरणीची कामे पूर्ण केली.परंतु सोयाबीन व इतर पिकास ज्यावेळी पावसाची आवश्यकता होती त्यावेळी मात्र पावसाने हुलकावणी दिल्यामुळे सोयाबीन जागेवरच वाळून गेले.

गंगाखेड (जिल्हा परभणी) : शासनाच्या  आदेशास केराची टोपली दाखवत शहरातील एचडीएफसी बँक दत्तक असलेल्या गावातील शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करत असल्याच्या पार्श्वभूमीवर पालम तालुक्यातील सायाळा (पा.) व कोठा येथील शेतकऱ्यांनी बँकेत धरणे आंदोलन (ता. 22) ऑक्टोबर गुरुवार रोजी केल्याची घटना घडली.

पावसाळ्याच्या प्रारंभी पावसाने पेरणी पूरक वेळोवेळी हजेरी लावल्यामुळे  उत्साही झालेल्या शेतकऱ्यांनी  बँकेसह खासगी सावकाराचे कर्ज काढून पेरणीची कामे पूर्ण केली.परंतु सोयाबीन व इतर पिकास ज्यावेळी पावसाची आवश्यकता होती त्यावेळी मात्र पावसाने हुलकावणी दिल्यामुळे सोयाबीन जागेवरच वाळून गेले.  ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढणी केली.त्यावेळेस परतीच्या पावसाचे स्वरूप  अतिवृष्टीमध्ये रुपांतरीत झाल्यामुळे  सोयाबीनसह  इतर पिके वाया गेली. यामुळे तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकरी अस्वस्थ झाला. खरिपाची पेरणी हातची गेली या विवंचनेने मध्ये शेतकरी असतानाच रब्बीच्या पिकावर थोडीफार आशा ठेवत शेतकऱ्यांनी गाव दत्तक असलेल्या बँकेकडे  पीक कर्जाची मागणी केली.परंतु शहरातील राष्ट्रीयीकृत बँकासह इतर बँकाही पीककर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत. शेतकऱ्यांना पीककर्ज मिळावे यासाठी तालुक्यातील विविध राजकीय पक्षांच्या वतीने वेळोवेळी आंदोलने करण्यात आली. तरीही पीककर्ज देण्यास बँक व बँकेतील कर्मचाऱ्यांची सकारात्मकता दिसत नाही. कारण पालम तालुक्यातील सायाळा (पा.)व कोठा ही दोन गावे शहरातील एचडीएफसी बँकेकडे दत्तक आहेत.

हेही वाचाराष्ट्रवादी काॅंग्रेस : ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी अनेकांचे गुडघ्याला बाशिंग, पक्षश्रेष्ठी घेणार निर्णय -

यांची होती उपस्थिती 

या गावातील शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी अर्ज सादर केली आहेत. परंतु पीककर्ज देण्यास बँक टाळाटाळ करत आहे व बँकेतील कर्मचारी शेतकऱ्यास उद्धटपणाची वागणूक देऊन कर्ज देण्यास विलंब करत असल्याच्या पार्श्वभूमीवर (ता. 22) ऑक्टोबर गुरुवार रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान या दोन गावातील शेतकऱ्यांनी बँकेमध्ये धरणे आंदोलन केले.तालुका प्रशासनाने मध्यस्थी केली असता पीककर्जा संदर्भात लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचा पावित्रा शेतकर्‍यांनी घेतला. यावेळी बँक प्रशासनाने दररोज वीस शेतकऱ्यांचे कर्ज प्रकरणे निकाली काढण्यात येतील असे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन मागे घेतले. सदरील आंदोलनात शेतकरी संघटनेचे मा.जिल्हा अध्यक्ष बंडु सोळंके,डाँ.सुभाष कदम,कृष्णा सोळंके, एकनाथ चवरे,सुनिल चवरे,मंचक चवरे,हरिभाऊ चवरे,गणेश चवरे,एकनाथ चवरे,आत्माराम चवरे अदिसह शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.

यापुढे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल

शेतकऱ्यावर आसमानी संकटासह सुलतानी संकटही आले आहे. कारण दत्त असलेल्या गावातील शेतकऱ्यांना बँकेतील कर्मचारी पीककर्ज देण्यास जाणून-बुजून टाळाटाळ करत आहे. यापुढे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.

- बंडू सोळंके, मा. जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना.

संपादन- प्रल्हाद कांबळे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parbhani: Farmers' agitation for crop loan parbhani news