साज चढला, घुंगरे बांधली...पण बैल मिरविलाच नाही

Pola festiva
Pola festiva
Updated on

परभणी  : कोरोना विषाणू संसर्गाचे सावट मंगळवारी (ता.१८) पोळा सणावर देखील स्पष्टपणे दिसून आले. एकाच ठिकाणी गर्दी नको म्हणून प्रशासनाने दिलेल्या सुचनाचे तंतोतंत पालन करून शेतकऱ्यांनी पोळा सण अत्यंत साध्या पध्दतीने साजरा केला. कुठेही बैलांची मिरवणुक काढण्यात आली नाही.

जिल्ह्यात बैल पोळा सण मंगळवारी (ता.१८) साधेपणाने साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांचा सोबती असलेल्या बैलांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. कोरोनाच्या संसर्गामुळे यंदा अनेक सण उत्सव हे आपल्याला घरीच साजरे करावे लागले आहेत. 'सोशल डिस्टन्सिंग' राखूनच कोरोनापासून दूर राहू शकतो. त्यामुळे बैलपोळा सणाला मोठ्या प्रमाणात एकत्र येणं टाळण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले होते. त्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. 

परभणी शहरातील मोठा मारुती संस्थानच्या परिसरात दरवर्षी बैलपोळ्याला बैलांची मोठी गर्दी होत असते. हा सोहळा पाहण्यासाठी शहरातील विविध भागातून लोक या ठिकाणी एकत्र होतात. परंतु यंदा हा परिसर बैला विना सुना सुना दिसत होता. शेतकरी फक्त नारळ फोडण्यासाठी या परिसरात आलेले दिसत होते. तेही तुरळक प्रमाणातच लोकांची संख्या होती. कोरोना विषाणु संसर्गाचे सावट या सणावर स्पष्टपणे जाणवत होते.

तो घुंगराचा आवाज व सजवलेला साज हरवला... 

मोठा मारुती परिसरात दरवर्षी पोळा सणाला मिरवणुक काढली जाते. हजारो बैलजोड्या या ठिकाणी येत असतात. त्यामुळे हा परिसर बैलांच्या गळ्या बांधलेल्या घुंगरांच्या आवाजाने दुमदुमून जाते. विविध रंगात सजवलेला साज डोळ्यांचे पारणे फेडतो. परंतु यंदा हा प्रकार या परिसरात दिसून आलाच नाही. यंदा कोरोनाच्या संकटामुळे तो घुंगराचा आवाज व सजवेलला साज हरवला असल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरीकांमधून व्यक्त होत होत्या.

कसा साजरा झाला पोळा... 

पोळा सण यंदा कोरोनाच्या सावटाखालीच साजरा झाला. प्रत्येक शेतकऱ्यांनी त्यांच्या घरासमोर किंवा शेतातच बैलांची मनोभावे पुजा करून त्यांच्या प्रति  कृतज्ञता भाव व्यक्त केला. बैलांना विविध रंगी साज आणला. गुळाची पोळी दिली, परंतू पोळ्याचा खरा आनंद यंदा मात्र शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरीकांना घेताच आला नाही. 

ऐरवी असा साजरा होतो पोळा... 

पोळा हा बैलांचा सण असून या दिवशी सकाळपासून बैलांना न्हाऊ माखू घातले जाते. त्यानंतर शिंगांना रंगरंगोटी, अंगावर झूल घालून पुरणपोळीचा नैवेद्य खायला दिला जातो. बैलांची खांदेमळणी केली जाते. बैलांचे खांदे गरम पाण्यानं धुतले जातात. त्यांच्या खांद्यांना हळद लावली जाते. बैलाला या दिवशी सर्व कामातून सुट्टी दिली जाते. बैलांना आणि इतर जनावरांना छान हिरवा चारा दिला जातो. पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो. दुपारनंतर बैलाला सजवतात. त्यांच्या शिंगांणा छान रंग दिला जातो. अंगावर झूल घालतात. बेगड्या चिटकवल्या जातात. डोक्याला बाशिंग आणि गळ्यात घुंगरांची माळ घातली जाते. यादिवशी नवीन वेसण, म्होरकी, कंडा बैलांना घातला जातो. बैलांच्या अंगावर विविध रंगांचे ठसे उमटवले जातात. त्यानंतर बैलांची पूजा करून त्यांची ढोल-ताशांच्या गजरामध्ये बैलांची मिरवणूक काढली जाते.

संपादन : सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com