परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा तिढा सुटला

परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा तिढा सुटला

परभणीः परभणी येथील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी २० एकर, शासकीय युनानी महाविद्यालयासाठी पाच एकर व तालुका क्रीडा संकुलासाठी दहा एकर जागेस वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने तत्त्वतः मंजुरी दिली असल्याची माहिती आमदार डॉ.राहुल पाटील यांनी शुक्रवारी (ता.११) दिली. 

परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्मितीची प्रक्रिया जागेअभावी रखडली होती. महाविद्यालयाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीने गंगाखेड रस्त्यावरील गौरक्षणच्या जागेची पाहणी केली होती. ही जागा सर्वदृष्टीने योग्य असल्याचा अहवालही या समितीने राज्य शासनाला सादर केला होता; परंतु नंतर या जागेवर तांत्रिक अडचण निर्माण होत होती. त्यामुळे परभणीचे खासदार संजय जाधव व आमदार डॉ. राहुल पाटील या दोघांनी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांची भेट घेऊन जागा उपलब्ध करून देण्याचे पत्र दिले होते. त्याचबरोबर या दोन्ही नेत्यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांची भेट घेऊन विद्यापीठातील जागेची देखील मागणी केली होती. 

कृषी विद्यापीठात कार्यकारी परिषदेची बैठक 
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात शुक्रवारी (ता.११) विद्यापीठ कार्यकारी परिषदेची बैठक पार पडली. यावेळी कुलगुरू डॉ.अशोक ढवण, आमदार डॉ.राहुल पाटील, कुलसचिव रणजित पाटील, कार्यकारी अभियंता श्री. स्वामी आदींसह सदस्यांची ऑनलाइन उपस्थिती होती. वैद्यकीय महाविद्यालयास सर्वसोयीने सुलभ अशी जागा देण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून या समितीच्या अध्यक्षपदी आमदार डॉ. राहुल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

शासकीय युनानी महाविद्यालयासाठी पाच एकर जागा 
परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास कृषी विद्यापीठातील जागा देण्याची मागणी खासदार संजय जाधव व आमदार डॉ.राहुल पाटील यांनी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने शुक्रवारी पार पडलेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा होऊन वैद्यकीय महाविद्यालयासाठी २० एकर जागा देण्यासंदर्भात तत्त्वतः मंजुरी देण्यात आली. शासकीय महाविद्यालय व्यक्तिरिक्त प्रस्तावित शासकीय युनानी महाविद्यालयासाठी पाच एकर जागेस तत्त्वतः मान्यता देण्यात आली; तसेच प्रस्तावित तालुका क्रीडा संकुलासाठी दहा एकर जागेस तत्त्वतः मंजुरी बैठकीत देण्यात आली आहे. 


पॉइंटर
- जागा देण्यासाठी समितीचे गठण 
- समितीच्या अध्यक्षपदी आमदार डॉ. राहुल पाटील यांची नियुक्ती 
- २० एकर जागा देण्यास तत्त्वत: मान्यता 
- युनानीसाठी देखील पाच एकर जागा 
- तालुका क्रीडा संकुलासाठी १० एकर जागा 

जागेसाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करू : खासदार संजय जाधव 
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाठी कृषी विद्यापीठाने मंजुर केलेल्या जागेच्या निश्‍चिततेकरिता राज्य सरकारकडे आपण पाठपुरावा करू, अशी ग्वाही खासदार संजय जाधव यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोर ढवण यांना (ता.नऊ) सप्टेंबर रोजी खासदार संजय जाधव यांनी एका लेखी पत्राद्वारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी विद्यापीठाच्या मालकीची २५ एकर जागा उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केली होती. खासदार जाधव यांनी आता या विषयाच्या अनुषंघाने शासनस्तरावर संबंधित यंत्रणांकडे आपण भक्कम असा पाठपुरावा करणार आहोत, असे एका पत्रकाद्वारे नमुद केले. 

पुढील कारवाई लवकरच केली जाईल
आज झालेल्या बैठकीत परभणीकरांच्या मागणीचा परिपूर्ण विचार करण्यात आला. या बैठकीत शासकीय महाविद्यालयासाठी जागा देण्यास तत्त्वत: मंजुरी मिळाली आहे. पुढील कारवाई लवकरच केली जाईल. 
- डॉ. राहुल पाटील, आमदार, परभणी 

संपादन ः राजन मंगरुळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com