Parbhani : जिंतूर तालुक्यात सिंचन व्यवस्था अत्यंत तोकडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Irrigation

Parbhani : जिंतूर तालुक्यात सिंचन व्यवस्था अत्यंत तोकडी

जिंतूर : तालुक्यातील जुन्या प्रकल्पांची अनेक वर्षांपासून दुरुस्ती नसल्याने रब्बी व उन्हाळी पिकांच्या सिंचनासाठी मोठी गैरसोय होत आहे. याचा पीक उत्पादनावर परिणाम होत आहे. जुन्या प्रकल्पांची दुरुस्ती केल्यास तालुक्यातील सिंचन व्यवस्था वाढून पीक उत्पादनातही वाढ होऊन शेतकऱ्यांची उन्नती होऊ शकेल. तसेच उन्हाळ्यात ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठीही मदत होऊ शकते.

जिंतूर तालुक्यात सिंचन व्यवस्था अत्यंत तोकडी असल्याने बहुतांश शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. ही उणीव भरून काढण्यासाठी जिल्हा परिषद, पाटबंधारे, मृद व जलसंधारण, वन खाते यासह वेगवेगळ्या विभागामार्फत तालुक्यात मागील २५ वर्षांत विविध योजनांतर्गत करपरा मध्यम प्रकल्पासह व लघू जलसिंचन प्रकल्प, पाझर तलाव, कोल्हापुरी बंधारे, सिमेंट बंधारे याप्रमाणे जलसंधारणाची हजारो कामे करण्यात आली आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात कोट्यवधीचा खर्च शासनाने केला. १९६७ ते १९७४ या काळात अनेक उपसा जलसिंचन प्रकल्प राबविण्यात आले.

अजूनही दरवर्षी नवीन प्रकल्पांची निर्मिती केली जात आहे. परंतु, जुन्या प्रकल्पांच्या दुरुस्तीकडे शासन, प्रशासनासह लोकप्रतिनिधी, तालुका पातळीवरील सामाजिक व राजकीय कार्यकर्ते यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे बहुतांश प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून, बांधावर झाडाझुडुपांसह मोठमोठी वृक्ष वाढली आहेत. बांधाची दगडी पिचिंगही निखळलेली तर अनेक ठिकाणी बांधावर पिचिंगच नाही. त्यामुळे पावसाळ्यात साठवण झालेले तलावातील पाणी पाझरून जाते. सिंचन तलावातून पाणी सोडण्याचे दार व चाऱ्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यानंतर बहुतांश प्रकल्पातील जलसाठा तळ गाठतो किंवा कोरडा पडतो.

अनेक लघु प्रकल्प अस्तित्वहीन

अतिवृष्टी व इतर कारणांमुळे अनेक लघु प्रकल्प अस्तित्वहीन बनले आहेत. त्याठिकाणच्या जमिनीचा उपयोग शेतीसाठी करण्यात येत आहे. वेळीच जुन्या प्रकल्पांची दुरुस्ती केल्यास रब्बी हंगामातील व उन्हाळी पिकांच्या सिंचनासाठी तसेच उन्हाळ्यात ग्रामीण भागातील पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी मदत होऊ शकते. शिवाय रानावनात पशुपक्ष्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल.