Parbhani : मानवतला सात दिवसांआड पाणीपुरवठा Parbhani Manvat water Supply beings every seven days | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Water Supply

Parbhani : मानवतला सात दिवसांआड पाणीपुरवठा

मानवत : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या झरी तलावात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. परंतु, सेलू- पाथरी मार्गाच्या रुंदीकरण कामामुळे झरी प्रकल्पाच्या ठिकाणी अपुरा विद्युत पुरवठा होत असल्याने शहराला सहा ते सात दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत.

शहराला पाथरी तालुक्यातील झरी येथील लघू तलावातून पाणीपुरवठा केला जातो. झरी तलावाची एकूण साठवण क्षमता १.८३६ दलघमी आहे. यापैकी जिवंत साठा क्षमता १.६३६ दलघमी आहे. झरी तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यास साधारणपणे साडेतीन ते चार महिने शहराची तहान भागवली जाते. त्याप्रमाणे हा तलाव जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यावर आहे. जायकवाडी प्रकल्पात देखील मुबलक पाणीसाठा असून,

सध्या डाव्या कालव्याद्वारे सिंचनासाठी पाणी सोडले जात असल्याने झरी तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. शहराची लोकसंख्या चाळीस हजार असून, सहा हजारावर नळजोडण्या आहेत. २०२० साली तलावाच्या ठिकाणी चोवीस तास विद्युत पुरवठा करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या एक्स्प्रेस लाइनचे काम मार्गी लागले आहे. यामुळे झरी तलाव येथे चोवीस तास विद्युत पुरवठा उपलब्ध असतो. परंतु, मागील दीड महिन्यापासून पाथरी- सेलू मार्गाचे रुंदीकरण काम सुरू आहे.

यामुळे या मार्गावरील आलेल्या एक्स्प्रेस लाइनचे देखील काम केले जात आहे. यामुळे झरी प्रकल्पाच्या ठिकाणी दररोज चार ते पाच तास विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे. याचा परिणाम म्हणून शहरातील पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. चार दिवसांवर असलेल्या आवर्तन काळ आता सात दिवसांवर गेला असल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत.

वेळीअवेळी पाणीपुरवठा

सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या झरी तलावावर असणाऱ्या विहिरीतून १४ इंच पाईपलाईनद्वारे मुख्य जलकुंभात पाणी आणले जाते. शहराची विभागणी एकूण २८ भागात करण्यात आली आहे. परंतु, पाणीपुरवठ्याची वेळ निश्चित नसल्याने नागरिकांची तारांबळ उडत आहे. काही वेळेस भर दुपारी बारा वाजता पाणीपुरवठा केला जातो तर काही वेळेस रात्री पाणीपुरवठा केला जात आहे.

टॅग्स :ParbhaniwaterSakal