परभणी : मंत्री वर्षा गायकवाड यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न, मराठा आरक्षण पेटले

गणेश पांडे
Wednesday, 16 September 2020

सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची गाडी आडविण्याचा प्रयत्न केला.

परभणी ः मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मंगळवारी (ता.१६) सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची गाडी आडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस व आंदोलनकर्ते यांच्यात बाचाबाची झाल्याने तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी आठ ते दहा कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे..

मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी गेल्या दोन दिवसापासून परभणी शहरात वेगवेगळे आंदोलने केली जात आहेत. काही दिवसापूर्वीच संभाजी ब्रिगेडच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली होती. त्याचवेळी मराठा आरक्षण मिळाल्या शिवाय जिल्ह्यात एकाही मंत्र्यांना किंवा आमदारांना फिरू दिले जाणार नाही असा इशारा देण्यात आला होता.  त्यानंतर सकल मराठा समाजाच्यावतीनेही आंदोलन करण्यात आले होते. दररोज आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाज आरक्षणाची मागणी लावून धरत आहे. दोन दिवसापूर्वी जिल्ह्यातील खासदार व आमदारांच्या घरासमोर सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करून त्यांना निवेदन दिले होते.  मंगळवारी (ता.१६) राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड या परभणी येथे आल्या होत्या. त्यांच्या उपस्थिती जिल्हाधिकारी कार्यालयात शिक्षण विभागाची बैठक झाली.

हेही वाचा सिध्देश्वरचे सर्व दरवाजे पाच फुटाने उघडले, तर इसापूरचे दोन दरवाजे उघडले

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीला आडविण्याचा प्रयत्न

या बैठकीला जातांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीला आडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी वेळीच मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना बाजूला सारून रस्ता मोकळा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी तसेच मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला. 

आंदोलनकर्ते व पोलिसांमध्ये काही काळ बाचाबाची 

सकल मराठा समाजाला तामिळनाडू राज्याच्या धर्तीवर आरक्षण मिळावे अशी या आंदोलन कर्त्यांची मागणी होती. मराठा आंदोलनाची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी तातडीने घटनास्थळाचा ताबा घेवून आंदोलन कर्त्यांना अटक केली. यावेळी आंदोलनकर्ते व पोलिसांमध्ये काही काळ बाचाबाची झाल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी आठ ते दहा कार्यक्रत्यांना ताब्यात घेवून नंतर सोडून दिले आहे. दरम्यान जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तो पर्यत आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

येथे क्लिक करा - Video - शालेय शिक्षणमंत्र्यांनी घेतला नांदेडमध्ये आढावा...

सरकाराने न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडण्यास हवी होती

या महाविकास आघाडी सरकारने राज्यातील संपूर्ण मराठा समाजाला धोका दिला आहे. या सरकाराने न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडण्यास हवी होती. परंतू तसे झाले नाही. आता सरकारने तातडीने या प्रकरणी पावले उचलून मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे अशी आमची मागणी आहे.

- सुभाष जावळे पाटील, आंदोलनकर्ते, परभणी

 

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parbhani: Minister Varsha Gaikwad's attempt to block the vehicle, Maratha reservation ignited parbhani news