परभणी : नव्या प्रभाग रचनेमुळे अनेक विद्यमान अडचणीत

भावी नगरसेवक सुरक्षीत प्रभागांच्या शोधात; पाठ फिरवलेले पुन्हा अवतरले
Parbhani municipal corporation election
Parbhani municipal corporation electionsakal

परभणी : आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात प्रभागातील काही भाग, वसाहतींकडे तसेच प्रभागातही न फिरकलेले अनेक विद्यमान नगरसेवक आता नव्या प्रभागरचनेमुळे अडचणीत आल्याचे चित्र आहे. पाठ फिरवलेल्या अनेक वसाहती नव्या प्रभागतही कायम राहिल्यामुळे त्यांनी पुन्हा समाज माध्यमांद्वारे नागरीकांना संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. पण ‘बुंद से गई वो हौदचे नही आती’, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

महानगरपालिकेचे ६० टक्क्यांपेक्षा अधिक विद्यमान नगरसेवक पुन्हा निवडून येत नाहीत, असा इतिहास आहे. जे नगरसेवक नागरिकांच्या संपर्कात राहिले, त्यांच्या समस्या सोडवता आल्या नाही तरी जाणून घेतल्या, ज्या शक्य असतील त्या सोडवल्या, प्रभागात विकास कामे केली, नागरिकांच्या वेळेला धावून गेले, असे नगरसेवक नागरीकांना जवळचे वाटतात, अन् पुन्हा ते उभा राहिल्यास नागरिक त्यांना पसंती देतात.

निवडून देण्याचाही प्रयत्न करतात. तसेच सर्वार्थाने मातब्बर असलेले नगरसेवक पुन्हा- पुन्हा निवडून येतात. शहर महानगरपालिकेत असेही अनेक नगरसेवक आहेत की जे आपल्या कामामुळे, लोकसंपर्कामुळे, पद, प्रतिष्ठा व पक्षाच्या सहकार्यामुळे वारंवार निवडून येतात. नगरपालिकेसह महापालिकेच्या निवडणुकीत सलग चार-पाच निवडणुकांमध्ये विजयी झाले आहेत.

नगरसेवकांच्या नाना तऱ्हा

स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांच्या नाना तऱ्हा दिसून येतात. निवडून आल्यानंतर काही नगरसेवक प्रभागात फिरतात. समस्या जाणून घेतात, त्या सोडविण्याचा प्रयत्न करतात, विकास निधीची सभागृहात मागणी करतात. पायाभूत स्वच्छता, पाणी आदींसाठी नागरिकांच्या विविध कार्यालयीन कामासाठी पुढाकार घेतात. सतत पाच वर्षे त्यांचा हा उपक्रम सुरु असतो. तर, काही जण वर्ष-दीड वर्षानंतर गायब होतात.

नागरिकांच्या समस्यांना सामोरे जात नाहीत, की त्यांना भेटत नाहीत. त्यामुळे हळूहळू नागरीकांना देखील अशा सेवकांचा विसर पडतो. काही नगरसेवक असेही असतात की, संपूर्ण प्रभागाचा विचार न करता आपण राहात असलेल्या भागात किंवा आपल्याला काही भागातच पाठबळ मिळाले, असे समज गृहीत धरुन त्याच भागावर लक्ष केंद्रित करतात. तेथेच अधिकाधिक विकास कामे खेचण्याचा प्रयत्न करुन अन्य भागाला मात्र वाऱ्यावर सोडतात. काही असेही नगरसेवक असतात की जे समाजमाध्यमांवर सक्रिय असतात. परंतु, समस्यांकडे दुर्लक्ष करतात, अशा एककल्ली नगरसेवकांची मात्र पुढील निवडणुकांमध्ये पंचाईत होते.

नव्या प्रभाग रचनेचा अनेकांना फटका

महानगरपालिकेने तीन सदस्यीय प्रभाग रचना जाहीर केली आहे. त्यामुळे विद्यमान चार सदस्यीय प्रभाग रचनेची पूर्णतः मोडतोड झाली आहे. विद्यमान अनेक नगरसेवक अडचणीत आल्याचे दिसून येते. त्यांनी ज्या भागावर लक्ष केंद्रित केले तो छोटासा भाग आता दुसऱ्या व मोठ्या प्रभागाला जोडल्या गेल्याचा त्यांना आता फटका बसल्याचे चित्र आहे.

इच्छुकांमध्ये संभ्रमावस्था

नव्या प्रभाग रचनेमुळे जुने अनेक प्रभाग दोन-तीन भागांत विभागले गेले आहेत. विभागल्या गेलेल्या नेमक्या कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवावी, अशी संभ्रमावस्था अनेकांमध्ये निर्माण झाली असून, ते सुरक्षीत प्रभागाचा शोध घेत असल्याचे दिसून येते. आता तर केवळ प्रभाग रचना झाली आहे. जेव्हा आरक्षण जाहीर होईल, तेव्हा तर अशा अनेकांची मोठी धांदल उडणार आहे. त्यातून अनेक विद्यमान नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणातही उतरणार नसल्याची शक्यता अधिक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com