Parbhani : रस्त्यांची कामे कधी मार्गी लागणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Parbhani

Parbhani : रस्त्यांची कामे कधी मार्गी लागणार?

परभणी : महापालिकेच्या वतीने शहरातील काही प्रमुख रस्त्यांसह अनेक वसाहतीअंतर्गत रस्त्यांची कामे वर्षांनुवर्षापासून प्रलंबित आहेत. पावसाळ्यात नागरिकांना यातना सहन कराव्या लागल्या. आता तरी प्रशासन या रस्त्यांची कामे मार्गी लावणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिकेच्या अपवाद वगळता बहुतांश योजनांना रखडल्या असल्याचे दिसून येते. कोणतीही योजना विहित कालावधीत अभावानेच पूर्ण होताना दिसून येत आहे.

यापूर्वीची यूआयडीएसएसएमटी योजना पूर्ण होण्यास तर १५ वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागला. या दरम्यान योजनेची किमतदेखील दुप्पट झाली. त्यामुळे कोणाचा लाभ झाला हा संशोधनाचा विषय असला तरी त्यामुळे परभणीकरांना मात्र अनेक वर्ष पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले ही वस्तुस्थिती आहे. त्याच पद्धतीने शहरातील रस्ते, नाल्यांची बांधकामे असोत की अन्य मोठे प्रकल्प. ते वेळेत कधीच पूर्ण होत नाहीत. प्रकल्पाची किमत वाढते की वाढवली जाते, दुबार निविदा प्रक्रिया राबवून नवीन दर मान्यता घेतली जाते अन् हे सातत्याने घडत असल्यामुळे पालिकेने विश्वास गमावला आहे.

शहराच्या अनेक वसाहतींमध्ये कुठे लोकप्रतिनिधींच्या निधीतून तर कुठे समाजसेवकांनी रस्त्यांची कामे हाती घेतली. परंतु, अनेक कामे अपूर्ण आहेत. रस्त्यावर गिट्टी तर अंथरून ठेवली. परंतु, वर्षभरापासून या रस्त्यांना डांबरीकरणाची प्रतीक्षा आहे. विलंब झाल्यामुळे तयार झालेले रस्तेदेखील पावसाच्या पाण्यामुळे खचले आहेत. अनेक भागात नाली बांधकामे अर्धवट सोडून दिल्यामुळे त्या भागात सांडपाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, त्यातून वाददेखील निर्माण होत आहेत.

नागरिक त्रस्त महापालिकेने शहरातील अनेक रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित केले. परंतु, या रस्ते कामासाठी पालिकेनेही पाठपुरावा करणे गरजेचे आहे. गेल्या सहा महिन्यांपासून निविदा मंजुरीसाठी मंत्रालयात पाठवण्यात आल्याचे या दोन्ही विभागाकडून सांगण्यात येते. मात्र, मंजुरीतील अडचणी दूर करण्याचा प्रयत्न मात्र न राजकीय न प्रशासकीय पातळीवर होताना दिसून येत नाही. उखडलेले रस्ते, खड्डे पडलेले रस्त्यांमुळे पावसाळ्यात पाण्यामुळे तर पाऊस नसेल धुळीमुळे नागरिक त्रस्त झालेले आहे.