
ग्रामपंचायत स्तरावर आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, स्वच्छाग्रही, जलसुरक्षक, पाणी पुरवठा कर्मचारी यासारख्या आदी कर्मचार्यांचे सहकार्य
परभणी ः मोकळ्या जागेवर प्लास्टिकचा कचरा पडल्याने त्याचे दुष्परिणाम समोर येत आहेत. त्यामुळे यावर अंकुश बसविण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गाव, वाडी, वस्ती, पंचायत समिती, कार्यालये याठिकाणी प्लास्टिक कचरा वेचण्याची व्यापक मोहिम ता. 21 व 26 जानेवारी रोजी राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी बुधवारी (ता.20) पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले, पाणी व स्वच्छता कक्षाचे समन्वयक ज्ञानेश्वर गायकवाड यांची उपस्थिती होती. या मोहिमे संदर्भात माहिती देतांना मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. टाकसाळे म्हणाले, जिल्हाभर स्वच्छता आणि प्लास्टिक मुक्तीची व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात जनजागृती आणि स्वच्छता मोहीम राबविणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत सर्व विभाग, पंचायत समिती, ग्रामपंचायती, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्रांनी त्यांच्या अधिनस्त कर्मचारी, यंत्रणेच्या मदतीने ही प्लास्टीक कचरा गोळा करण्याची मोहीम यशस्वीपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायत स्तरावर आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, स्वच्छाग्रही, जलसुरक्षक, पाणी पुरवठा कर्मचारी यासारख्या आदी कर्मचार्यांचे सहकार्य घ्यावे, असेही कळविण्यात आले आहे. या मोहिमेतून गोळा झालेला प्लास्टिक कचरा एकत्र करुन महापालिका, नगर परिषदांच्या सहकार्याने विघटनाची प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे श्री.टाकसाळे यांनी सांगितले.
मोहिमेसाठी पालक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
या मोहिमेसाठी पालक अधिकार्यांची नेमूणक करण्यात आली आहे. यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) मंजुषा जाधव-कापसे (परभणी), पंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव (मानवत), पाणी व स्वच्छता उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले (पुर्णा), ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता गंगाधर यंबडवार (पालम), बांधकाम उपअभियंता डी.एस.उडाणशिवे (जिंतूर), प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.सुचिता पाटेकर(पाथरी), महिला व बालकल्याण उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैंलास घोडके (सोनपेठ), गटविकास अधिकारी जयंत गाडे (गंगाखेड), समाज कल्याण अधिकारी सचिन कवले (सेलू) यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे