Parbhani : परभणी पोलिसांची धडाकेबाज कारवाई ; २७ लाखांचा मुद्देमाल जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

Parbhani : परभणी पोलिसांची धडाकेबाज कारवाई ; २७ लाखांचा मुद्देमाल जप्त

परभणी : सरत्या वर्षाला निरोप देत असताना परभणी पोलिसांनी मात्र धडाकेबाज कारवाई करत मोबाईल चोरांच्या आंतर जिल्हा टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या टोळीच्या म्होरक्यासह अन्य एकाला पोलिसांनी मालेगाव (जि. नाशिक) येथून ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून तब्बल २७ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

शहरातील नारायण चाळ परिसरात असलेल्या गिफ्ट मोबाईल शॉपीचे शटर तोडून लाखो रुपयांचे मोबाईल चोरीला गेल्याची घटना २३ ऑक्टोबर रोजी घडली होती. पोलिस अधिक्षक रागसुधा आर. या पोलिस अधिक्षक पदावर रुजू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी ही घटना घडल्याने पोलिसांनी या घटनेला गांभीर्याने घेत तपास सुरु केला होता. चोरट्यांनी गिफ्ट वर्ल्ड मोबाईल दुकानातून महागड्या कंपनीच्या मोबाईलसह अन्य काही वस्तू चोरी केल्या होत्या. या ठिकाणावरून तब्बल ४८ लाख ५१ हजार ७३२ रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची तक्रार दुकान मालक राजेश चावला यांनी दिली होती

या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्यावतीने करण्यात आला. ता. २९ ऑक्टोबर सायबर शाखा व सिसिटिव्ही फुटेजच्या आधारे दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्याकडून ९ लाख ८२ हजार ३११ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. याच प्रकरणात पुढील तपास करत असताना पोलिसांना ता. ३० डिसेंबर रोजी या प्रकरणातील दोन संशयित आरोपी अकबर खान हबीब खान (रा. अक्सा कॉलनी, मालेगाव, जि. नाशिक) व कैसरखान हबीब खान (वय २१, रा. पवारवाडी मालेगाव, जि. नाशिक) हे दोघेही त्यांच्या घरी असल्याची माहिती पोलिसांच्या पथकाला मिळाली होती. पोलिसांनी शनिवारी, ता. ३१ डिसेंबर रोजी या दोन्ही संशयितांच्या घराजवळ सापळा रचून त्यांना मोठ्या शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून परभणीतील गुन्ह्यात लंपास केलेला मुद्देमाल जप्त केला. यात ४२ मोबाईल ज्याची किंमत ८ लाख २९ हजार ३८५ आहे तो जप्त केला आहे.

याच टोळीने शिवाजी नगर, लातूर येथेही मोठी चोरी केली होती. त्याचाही उलगडा या तपासात झाला. या गुन्ह्यातील ४ एलईडी टिव्ही, १ ओहन व १ साऊंड सिस्टीम असा ७ लाख २८ हजार ८७० रुपयांचा मुद्देमाल परभणी पोलिसांनी त्यांच्याकडून जप्त केला आहे.

परभणी व लातूर येथील दुकान फोडीच्या घटनेतील सर्व आरोपी एकच आहेत. त्यातील तीन आरोपींना परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. परभणी येथील गुन्ह्यातील १८ लाख ११ हजार ६९६ तर लातूर येथील गुन्ह्यातील ७ लाख २८ हजार ८७० असा २५ लाख ४० हजार ५६६ रुपयांचा मुद्देमाल परभणी पोलिसांनी हस्तगत केला आहे.

- रागसुधा आर., पोलिस अधिक्षक, परभणी