Parbhani : "रब्बी"पीकविमा योजनेसाठी ३१ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पीक विमा योजना

Parbhani : "रब्बी"पीकविमा योजनेसाठी ३१ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

परभणी : प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील गहू, हरभरा पिकांसाठी १५ डिसेंबर तर उन्हाळी भुईमुगासाठी ता. ३१ मार्च २०२३ पर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे यांनी केले आहे.

रब्बी अन्नधान्य व गळीतधान्य यासाठी विमा हप्ता दर दीड टक्का व नगदी पिकासाठी पाच टक्के आहे. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे उंबरठा उत्पन्न हे सर्व पिकांसाठी त्या हंगामातील मागील सात वर्षांपैकी सर्वाधिक उत्पन्नाच्या पाच वर्षांचे सरासरी उत्पन्न गुणिले त्या पिकाचा जोखीमस्तर असेल. उंबरठा उत्पन्न आणि कंपनीने सादर केलेला विमा हप्ता दर दोन्हीही एका वर्षासाठी स्थिर असतील. या योजनेंतर्गत रब्बी हंगाम २०२२-२३ साठी जोखीमस्तर सर्व अधिसूचित पिकांसाठी ७० टक्के निश्चित करण्यात आला आहे. पीक पेरणीपासून

काढणीपर्यंतच्या कालावधित नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग यासारख्या टाळता न येणाऱ्या जोखमींमुळे पिकांच्या उत्पन्नातील घटीपासून व्यापक विमा संरक्षण मिळणार आहे.

परभणी जिल्ह्यामध्ये रब्बी हंगाम २०२२-२३ साठी आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि. या विमा कंपनीकडून राबविण्यात येणार आहे. परभणी जिल्ह्यासाठी गहू (बागायत) ६३० व हरभरा ५६२.५० आणि उन्हाळी भुईमुगासाठी ६४४.५७ असा पीकनिहाय विमा हप्ता दर राहणार आहे. योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी गहू (बागायती) व हरभरा पिकासाठी ता. १५ डिसेंबर आणि उन्हाळी भुईमुगासाठी ता. ३१ मार्च २०२३ ही पीक विमा भरण्यासाठी अंतिम मुदत आहे.

असे हवेत कागदपत्रे

पीकविमा भरताना शेतकऱ्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज, आधार कार्ड आधार नोंदणीची प्रत, सातबारा उतारा, अधिसूचित पिकांची पेरणी केलेले स्वयंघोषणापत्र, भाडेपट्टा करार असलेल्या शेतकऱ्यांचा करारनामा, संमतीपत्र आणि बँक पासबुकची प्रत सोबत ठेवणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँक, व्यापारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि सामाईक सुविधा केंद्राकडे अर्ज दावा करता येणार आहे.

अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, संबंधित तालुका कृषी अधिकारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीय बँकेशी संपर्क साधावा.

- विजय लोखंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, परभणी