Parbhani : रब्बी हंगामात वाढला विजेचा लपंडाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sulu

Parbhani : रब्बी हंगामात वाढला विजेचा लपंडाव

देवगावफाटा : ऐन रब्बी हंगामात विजेचा लपंडाव वाढला आहे. यामुळे शेती ओलित करायची कशी? असा प्रश्न आता ग्रामीण भागातील भागातील शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.रब्बी हंगाम सुरू होताच दरवर्षी महावितरणकडून कृषी पंपाच्या थकीत बिलाची वसुली मोहीम सुरू केली जाते. त्यात शेतकरी आर्थिक संकटात असल्यामुळे वेळेवर बिले भरू शकत नाहीत. परिणामी, महावितरणकडून कृषी पंपाचे वीज कनेक्शन कट केले जाते. रब्बीच्या पिकांना वेळेवर पाणी न मिळाल्यामुळे पिके सुकून जातात. शेतकऱ्यांची मोठी आर्थिक हानी होते. कधी निसर्ग तर कधी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते.

यंदा खरीप हंगामात जोरदार पाऊस झाला होता. या पावसामुळे शेतकऱ्यांची पिके जोमात आली होती. परंतु, ऐन पिके काढणीला आली अन् अतिवृष्टी झाली. यात पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहेत. असे असतानाही शेतकरी आता रब्बी हंगामाची तयारी करीत आहेत. तर, बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी देखील केली आहे. त्यामुळे शेतकरी गव्हासह हरभरा या पिकांना पाणी देत आहेत. परंतु, वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे महावितरणकडून वारंवार वीज पुरवठा खंडित केला जात आहे. त्यातच दिवसा न वीज सुरू ठेवता रात्रीच्यावेळी वीजपुरवठा सुरू ठेवला जात असल्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्यावेळी पिकांना पाणी द्यावे लागत आहे. याकडे आता शासनाने लक्ष देऊन शेतकऱ्यांना पूर्णवेळ वीजपुरवठा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

अखंड वीजपुरवठा कधी?

अतिवृष्टीने अगोदरच शेतकऱ्यांच्या हातून खरीप हंगाम गेला. त्यात शेतकऱ्यांना मदतीचा हात न देणे, खोटी आश्वासन देऊन राजकीय नेत्यांनी पाठ फिरवली आहे. आता रब्बी हंगामात खरिपाची नुकसान भरपाई भरून काढू, या आशेने शेतकरी तयारी करीत आहे. पण, विजेचा लपंडाव सुरू असल्याने अखंड वीजपुरवठा कधी मिळेल, असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

अगोदरच अतिवृष्टी झाली असल्याने शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. त्यात महावितरणकडून वारंवार वीजपुरवठा खंडित केला जात असल्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यास अडचण निर्माण होत आहे. शासनाने कृषी पंपासाठी दिवसा १२ तास आणि मोफत अखंडित वीजपुरवठा करून दिलासा द्यावा.

-राजेंद्र गाडेकर, तालुकाध्यक्ष, युवक काँग्रेस, सेलू