
मूळचे हावरगाव (ता. कळंब जि. उस्मानाबाद) येथील रहिवासी असलेले प्रा. डॉ. श्रीधर मधुकरराव कोल्हे यांचे कुटुंब मागील ३०-३५ वर्षांपासून परभणीत वास्तव्यास आहे
परभणी : हुंड्याचे मोठे प्रस्थ वाढलेल्या आधुनिक काळात हुंडा नाकारून हुंडा पद्धतीला फाटा देत परभणीच्या उच्चशिक्षित कोल्हे कुटुंबियांनी समाजासमोर एक फार मोठा आदर्श ठेवला आहे.
मूळचे हावरगाव (ता. कळंब जि. उस्मानाबाद) येथील रहिवासी असलेले प्रा. डॉ. श्रीधर मधुकरराव कोल्हे यांचे कुटुंब मागील ३०-३५ वर्षांपासून परभणीत वास्तव्यास आहे. स्वत: डॉ. श्रीधर कोल्हे हे जिंतूर येथील ज्ञानोपासक महाविद्यालयात वाणिज्य विभागात प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. तर त्यांच्या पत्नी डॉ. विजया कोल्हे या परभणीच्या संत तुकाराम महाविद्यालयात हिंदी विषयाच्या प्राध्यापिका म्हणून नोकरीला आहेत.
या कोल्हे दांपत्याचा मुलगा अभिजीत याने पुणे येथील व्ही. आय. टी. या शिक्षण संस्थेतून बी. टेक. पूर्ण केलेले असून तो सध्या पुणे येथील सिग्मा ओ. एस. एस. सिस्टीम या कंपनीत सीनियर डेव्हलपर म्हणून मोठ्या पगारावर नोकरीला आहे.
नुकतेच डॉ. श्रीधर कोल्हे हे आपल्या मुलाला म्हणजे अभिजीतला मुलगी पाहण्यासाठी काही निकटवर्तीयांना सोबत घेऊन माजलगावला डाके कुटुंबियांकडे आले होते. मूळचे डाके पिंपरी (ता. माजलगाव जि. बीड) येथील रहिवासी तथा प्रगतिशील शेतकरी संदिपान डाके यांची नात आणि आनंद डाके यांची मुलगी कु. अंकिता हिला एका बैठकीत पाहण्याचा कार्यक्रम झाला.
हेही वाचा - कहरच ! राम मंदिर वर्गणीच्या मिरवणुकीत चक्क पीआय युनिफॉर्ममध्ये थिरकले; पाहा व्हिडिओ
पाहुण्यांच्या या बैठकीत सुरूवातीला दोन्ही बाजूंकडून इकडचे-तिकडचे बोलणे झाले. नंतर मुलगी पहाण्यात आली. आणि या बैठकीतच कोल्हे कुटुंबियांनी अंकिता हीस आपली पसंती तर दिलीच, शिवाय 'आमच्या मुलासाठी आम्ही एक रुपयाचाही हुंडा घेणार नाही', असा निर्धार सर्वांसमोर बोलून दाखविला. तेव्हा उपस्थितांना सुखद धक्का बसला अन सारेच आवाक् झाले.
म्हणजे नुसते बोलूनच नाही तर प्रत्यक्ष कृतीतून कोल्हे कुटुंबियांनी हुंड्याचे प्रस्थ वाढलेल्या आजच्या जमान्यात हुंडा नाकारून हुंडा पद्धतीला फाटा देत समाजापुढे एक मोठा आदर्श प्रस्थापित केला आहे. कोल्हे कुटुंबियांचा हा निर्णय निश्चितच अभिनंदनीय आणि आदर्शवत असा असून त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
आपल्या मुलासाठी पसंत केलेल्या अंकिता हिचे एम. बी. ए. फायनान्स असे शिक्षण झाले असून ती सुद्धा पुणे येथील मेट्रो ग्लोबल बिझनेस सर्व्हिस या कंपनीत नोकरीला आहे. तिचे वडील आनंद डाके बागायतदार शेतकरी आणि व्यावसायिक आहेत. तर आजोबा संदिपान डाके हे उपप्राचार्य राहिलेले आहेत. तसेच चुलते डॉ. अभयसिंग डाके हे अर्थोपेडिक्स असून ते सामाजिक कार्यात सक्रीय असतात.
येथे क्लिक करा - आर्ची म्हणाली मराठीत बोललेलं कळत नाही... गोरमाटीत बोलू....जय सेवालाल !
तात्पर्य कोल्हे आणि डाके हे दोन्ही कुटुंबीय उच्चशिक्षित असून या दोन कुटुंबात बिगर हुंड्याची आदर्श अशी सोयरीक जुळली आहे. आता हुंडा नाही म्हटल्यावर लग्नात रुसणे-फुगणेही राहणार नाही. म्हणजेच हा विवाहसोहळा सुद्धा आदर्शवतच होणार, हे वेगळे सांगायला नको.
आज हुंड्याचे प्रस्थ एवढे वाढले आहे की, हुंडा शब्द ऐकताच कोणत्याही मुलीच्या वडिलाच्या काळजात धसकन होते. एवढेच नव्हे तर हुंड्याला घाबरून अनेकांनी विशेषत: शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे. अशा काळात कोल्हे कुटुंबियांनी हुंडा नाकारून वधू पक्षाला मोठा दिलासा तर दिलाच. विशेष म्हणजे समाजासमोर एक आदर्श उभा केला आहे. अशा या कोल्हे कुटुंबियांकडून समाजाने काही बोध घेतला तर त्यात समाजाचे निश्चितच भले होणार आहे, एवढे मात्र खरे!
संपादन- प्रल्हाद कांबळे