esakal | परभणी : पेडगांवचे रेणुका देवी मंदीर व हलती दीपमाळ पर्यंटकांचे आकर्षण 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

पेडगाव हे परभणी जिल्ह्यातील परभणी पासून पाथरी रोडवर १५ किलोमीटर अंतरावरील १० हजार लोकसंख्येचे गाव आहे. तसेच रेल्वे मार्गावरील परभणीहून औरंगाबाद कडे जातानाचे पाहिले रेल्वे स्टेशन आहे.

परभणी : पेडगांवचे रेणुका देवी मंदीर व हलती दीपमाळ पर्यंटकांचे आकर्षण 

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः सध्या नवरात्र सुरु आहे. या निमित्य भाविक दररोज कोणत्या ना कोणत्या देवीच्या दर्शनासाठी जरुर जात असतात. परभणी जिल्ह्यातील पेडगाव या गावात रेणुकामातेचे मंदिर आहे. या ठिकाणी असलेली दीपमाळ भाविकांच्या आकर्षणाचा विषय ठरतो. याचे कारण म्हणजे या ठिकाणी असलेली हालती दीपमाळ आहे.

पेडगाव हे परभणी जिल्ह्यातील परभणी पासून पाथरी रोडवर १५ किलोमीटर अंतरावरील १० हजार लोकसंख्येचे गाव आहे. तसेच रेल्वे मार्गावरील परभणीहून औरंगाबाद कडे जातानाचे पाहिले रेल्वे स्टेशन आहे. पेडगाव हे सातशे वर्षापूर्वी पासून एक बाजार पेठेचे ठिकाण आहे.त्यामुळे याचे मूळ नाव पेठगाव असे होते. महमद तुघलक याने देवगिरी काबीज केल्यानंतर त्याचा फौज फाटा या ठिकाणी आला. त्या भीतीने येथील गावकरी पळून गेले. राहिलेल्या लोकांना तुघलकी फौजेने मारून टाकले. त्यानंतर हे गाव जवळपास तीनशे वर्ष निर्मनुष्य होते. अंदाजे तीनशे वर्षापूर्वी निजामी सरदार अजितशहा या ठिकाणी शिकारीसाठी आला. त्याला हा परिसर फारच आवडला. निजामाला खुश करण्याच्या उद्देशाने त्याने सोबतच्या चार देशमुखांना देशमुखी सनदा देऊन या ठिकाणी वास्तव्य करून वस्ती करण्यासाठी सांगितले. असाही उल्लेख आहे की या परिसरात घनदाट जंगल असल्याने व सर्वत्र झाडे असल्याने देशमुखी सनदेत याचा उल्लेख "पेडाचे गाव " असा आहे.नंतर पेढगावचे पेडगाव असे नामांतर झाले असावे.

हलती दीपमाल स्थापत्य कलेचा अनोखा नमुना

या गावात प्रवेश करताना दक्षिणेस प्रथमदर्शनी श्री.रेणुका मातेचे मंदिर आहे. आतील गाभाऱ्यात रेणुका मातेचा भव्य तांदळा आहे. या गाभाऱ्याचे वैशिष्टय असे की, हा गाभारा उन्हाळ्यात थंड तर हिवाळ्याच्या कडक थंडीतही उबदार वाटतो. देवीचे हे स्थान ग्रामदेवतेच्या रूपाने एक श्रद्धास्थान आहे. या देवीच्या मंदिरा समोर एक उंच मिनार आहे. यास दीपमाळ असे म्हणतात. या दिपमाळेची उंची २६ फूट असून बुडाचा परिघही २६ फूट आहे. या दिपमाळेचे खास वैशिष्ट्य म्हणजे आजही वरच्या टोकावरून दीपमाळ हलवली. तर ती खाली बुडापर्यंत हलते. हा एक प्रकारचा झुलता मनोराच आहे.

अश्विन शु.प्रतीपदे पासून विजया दशमी पर्यंत मोठा ऊत्सव

मागील काही वर्षांपर्यंत ही दीपमाळ हलवली की बाजूच्या बारवेतील पाण्यात बुडबुडे निघत. या हलत्या मिनारचे व पाण्यातील निघणाऱ्या बुडबुड्याचे गूढ शोधण्याचा प्रयत्न ब्रिटिशांनी व निजामानी केला. पण त्याचे गूढ काही समजले नाही. स्थापत्य कलेचा व वास्तू कलेचा हा एक अनोखा नमुना आहे.या मंदिराच्या बाबतीत अनेक दंतकथा सांगितल्या जातात. परंतु त्या काल्पनिकच आहेत. या ठिकाणी प्रतिवर्षी अश्विन शु.प्रतीपदे पासून विजया दशमी पर्यंत मोठा ऊत्सव होतो. पणं यावर्षी कोरोना संक्रमणाचा धोका असल्याने पहिल्यांदाच हा उत्सव आयोजित करण्यात आलेला नाही.

संपादन - प्रल्हाद कांबळे