जागतिक पर्यटन दिन : साईंच्या कर्मभूमीप्रमाणेच जन्मभूमी येतेय नावारुपास...

धनंजय देशपांडे
Sunday, 27 September 2020

शिर्डी येथील साईबाबा संस्थांचे तत्कालीन विस्वस्त विश्वास बाळासाहेब खेर ( मुंबई ) यांनी अनेक सबळ पुराव्यांच्या आधारे साईबाबांचे जन्मस्थान पाथरी ( जि.परभणी) असल्याचे जगासमोर आणले.

पाथरी ( जिल्हा परभणी) : सबका मलिक एक हें असा राष्ट्रीय संदेश देणारे थोर संत श्री साई बाबांचे जन्मस्थान असलेले पाथरी येथील भव्य मंदिर पाहण्यासाठी व साई दर्शनासाठी भक्तांचा ओढा वाढत चालला आहे. गेल्या वर्षभरात या मंदिराला जवळपास दोन ते अडीच लाख भाविकांनी भेट दिली आहे. यात परदेशी भविकांचाही समावेश आहे. एक तीर्थक्षेत्र म्हणून पाथरी नावारूपास येत आहे.

शिर्डी येथील साईबाबा संस्थांचे तत्कालीन विस्वस्त विश्वास बाळासाहेब खेर ( मुंबई ) यांनी अनेक सबळ पुराव्यांच्या आधारे साईबाबांचे जन्मस्थान पाथरी ( जि.परभणी) असल्याचे जगासमोर आणले. साईबाबा हे दत्ताचे अवतार होते. याचा उल्लेख श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृताही आहे.  श्री साईबाबा संस्थानच्या १९७२ मध्ये प्रकाशीत पुस्तकातही याचा उल्लेख आढळतो. त्यामध्ये स्वतः साईबाबांनी त्यांचे परम भक्त श्री म्हाळसापतींना आपण पाथरी येथे जन्म घेतल्याचे नमुद आहे. या आधारावरन विश्वास खेर हे १९७५ साली पाथरीत आले.  ग्रामस्थांशी संवाद साधताना  पुरावा एकत्र जोडून पाथरी हीच साईबाबांची जन्मभूमी असल्याचे सिध्द केले.

विजया दशमीला मंदिराची पाया भरणी

१ जून १९७८ रोजी साईबाबांचे वंशज प्रा. र. म. भुसारी यांनी साईस्मारक समिती स्थापन केली. ता. १३ आक्टोबर विजय दशमीच्या मुहूर्तावर मंदिराचे भूमिपूजन करून मंदिर बांधकामाला सुरुवात केली. यावेळी खोदकाम करताना दोन कमानी व एक भुयार आढळले. त्यात जाती, मारुती व खंडोबाच्या मुर्ती पूजेची उपकरने आदी वस्तू सापडल्या. १९ ऑक्टोबर १९९९ ला  मंदिराचे उदघाटन करण्यात आले.

पंच धातूची मूर्ती

मंदिरात विराजमान असलेली श्री साईबाबांची मूर्ती पंच धातूची असून शिर्डी येथील मूर्तीचे शिल्पकार श्री तालीम यांच्याच मुलाने पाथरीच्या मंदिरातील मुर्ती बनवली आहे. हा देखील एक योगायोगच म्हणावा लागेल. साई मंदिर परिसरात मंदिर समितीच्या वतीने वीस खोल्याचे भव्य भक्त निवास उभारले असून त्यात चार खोल्या वातानुकूलित आहेत. वाजवी दरात भाविकांना दिल्या जातात.

असा आहे मार्ग

पाथरी येथे जाण्यासाठी परभणी शहरातून बसेस तसेच खासगी वाहने जातात.औरंगाबादहून पुर्वेकडे पाथरी हे गाव गेवराई, माजलगाव मार्गे १८४ किलोमिटर अंतरावर आहे. तसेच रेल्वे मार्गाने मानवतरोड या रेल्वे स्थानकावर उतरून तेथून खासगी वाहने किंवा बसने पाथरी येथे जाता येते.

संपादन - प्रल्हाद कांबळे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Like Parbhani Sai's karma bhoomi, Janmabhoomi comes with a name parbhani news