
Parbhani : वारकरी संप्रदायाशिवाय पर्याय नाही ; अमोल मिटकरी
परभणी : धर्माच्या नावाने समाजाला लुटणाऱ्यांना रोखण्याचे काम संतांनी केले आहे. समाजाला व्यसनापासून, अंधश्रद्धेपासून दूर न्यायचे असेल तर वारकरी संप्रदायाशिवाय पर्याय नाही. भोंदूबाबांच्या आहारी गेलेल्या व अंधश्रद्धेच्या गर्तेत सापडलेल्या समाजाला बाहेर काढण्याची जबाबदारीही वारकरी सांप्रादयाची आहे, असे प्रतिपादन आमदार अमोल मिटकरी यांनी सोमवारी (ता. १३) केले.
येथील संत तुकाराम महाविद्यालयाच्या प्रांगणात ११ व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनात सोमवारी दुपारी झालेल्या परिसंवादात ते बोलत होते. ‘संतांच्या भूमिकेतून व्यसनमुक्ती व जादूटोणा विरोधी प्रचार’ हा परिसंवादाचा विषय होता.
अध्यक्षस्थानी जवळेकर महाराज होते. व्यासपीठावर परिषदेचे अध्यक्ष विठ्ठलराव पाटील, राज्याच्या सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे, स्वामी महाराज भिसे, संत तुकोबारायाचे वंशज बापूसाहेब देहूकर, बालासाहेब मोहिते, माजी नगरसेवक सचिन देशमुख, नितीन देशमुख, रामेश्वर आवरगंड यांची उपस्थिती होती.
आमदार मिटकरी पुढे म्हणाले, ‘‘शासनाने अंधश्रद्धा निर्मुलन समितीचा जो कायदा केला, त्याची विचारधाराच संत तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये आहे. महाराष्ट्राला सातशे वर्षांची संत परंपरा लाभली. मी ग्रामगीता वाचली. संत तुकडोजी महाराजांनी चिकित्सा केली होती की वेद, शास्त्र, पुराण, दंतकथा याचा प्रचार होतोय. लोकांना कळत नव्हते की कोणत्या देवाला भजावे. हा संभ्रम जेव्हा निर्माण झाला होता. त्यावेळी संत नामदेव,
संत ज्ञानेश्वरांनी पंढरीचा पांडुरंग डोळ्यांसमोर ठेवला. संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत सखुबाई, संत चोखोबा यासह सर्व संतांच्या विचाराचा परिपाक म्हणजे हा कायदा आहे. परप्रांतीय महाराजांचे वेस्टर्ण कल्चर आले आहे. त्याचा विरोध झाला पाहिजे’’, असेही ते यावेळी म्हणाले. छु-छा करणारे हे बाबा हे संत नाहीत तर भोंदू आहेत.
चमत्काराच्या भरवशावर ज्यांच्या दुकानदाऱ्या सुरू आहेत, त्यांचाच या कायद्याला विरोध आहे’’, असेही श्री. मिटकरी यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी विविध संतांच्या अभंगातून अंधश्रद्धा, दृष्टप्रवृत्ती, भोंदूगिरी यावर आसूड ओढले. संत चमत्कार करीत नाहीत. चमत्कार करणारे संत नाहीत. संतांच्या नावांनी दलाली करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहेत.
सध्या व्यसन व अंधश्रद्धेचे प्रमाण वाढले आहे. वास्तुशास्त्राच्या नावाने लूट सुरू आहे. त्यापासून समाज दूर न्यायचे असेल तर या देशाला वारकरी सांप्रादायाशिवाय पर्याय नाही’’ असेही मिटकरी म्हणाले. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे यांनीही या परिसंवादात सहभाग नोंदवला.
१४ लोक बुवाबाजी करणारे ः स्वामी महाराज भिसे
स्वामी महाराज भिसे म्हणाले, ‘‘अखिल भारतीय आखाडा परिषदेने एक यादी जाहीर केली होती. या संपूर्ण देशात असे १४ लोक आहेत, की जी बुवाबाजी करणारे आहेत. त्यामध्ये रामरहीम, आसारामबापू, राधे मा यांचाही त्यामध्ये समावेश होता.
ही एक महत्त्वाची परिषद आहे. २१ व्या शतकातही हे जाहीर करावे लागते की, ही बुवाबाजी करणारी माणसे आहेत. पाठीमागे गेले असता १२-१३ व्या शतकापासून १७ व्या शतकापर्यंत वारकरी परंपरा मुरलेली आहे. त्यांनी सांगितलेली भक्ती, साधना व आत्ताची साधना यात जमीन अस्मानाचा फरक आहे. संतांनी मांडलेला जादुटोणा विरोधी विचार, व्यसनमुक्ती सारख्या विचारांची आजही गरज आहे. संतांचा विचार आचरणात आणण्याची गरज आहे.’’