परभणीत तीन दिवस संचारबंदी

file photo
file photo

परभणी : ग्रीन झोनमध्ये असलेल्या परभणी शहरात कोरोना विषाणू संक्रमित व्यक्ती आढळून आल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. बाजारात होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ता. १७ ते १९ एप्रिलपर्यंत परभणी शहरात संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. या संचारबंदीमध्ये केवळ सहा अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परभणी जिल्ह्यात अधिपासूनच प्रशासनाने काळजी घेतली होती. परंतु, गुरुवारी शहरातील एमआयडीसी भागाजवळील एका कॉलनीत कोरोना विषाणूची लागण झालेला रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. शहरातील पोलिसांच्या बंदोबस्तात वाढ केली आहे. रस्त्याने फिरणारे नागरिकांची कसून चौकशी केली जात आहे. रस्त्याने कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या लोकांची संपूर्ण माहिती नोंद करून घेतली जात आहे. या आधीच शहरातील कॉलन्यांचे रस्ते सील केले आहेत. जेणे करून लोकांनी मोटारसायकलद्वारे कुठेही फिरू नये. तो नियम ही अधिकच कडक करण्यात आला आहे. शहरातील प्रत्येक ठिकाणी पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. 

जिल्ह्यात ४४९ संशयितांची नोंद
परभणी जिल्ह्यात गुरुवारपर्यंत (ता. १६) ४४९ संशयित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ३७१ स्वॅब पैकी ३२९ निगेटिव्ह असून २४ अहवाल प्रलंबित आहेत. कोरोना विषाणूसंदर्भात गुरुवारी (ता. १६) सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालय परभणी येथे ४४९ संशयितांची नोंद झालेली आहे. १५० जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे. ६४ रुग्णालयात संसर्गजन्य कक्षात आहेत. ४४९ संशयित रुग्णापैकी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद यांनी एक रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे कळविले आहे. आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे यांनी जिल्हा रुग्णालयास गुरुवारी भेट दिली. परभणी जिल्हा प्रशासन परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व प्रकारे सज्ज आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून न जाता कुठल्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले आहे.

हेही वाचा व पहा - व्हिडिओ : पोलिस हवालदार विठ्ठल कटारे यांची गाण्यातून जनजागृती

‘त्या’ परिसराचे दोन वेळेस निर्जंतुकीकरण
कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याचे स्पष्ट होताच एमआयडीसी परिसरातील एका वसाहतीला सीलबंद करण्यात येत आहे. तर महापालिकेनेदेखील प्रतिबंधक उपाययोजना म्हणून तत्काळ बाधित रुग्णाच्या घरासह परिसराचे  निर्जंतुकीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. संपूर्ण परिसराचे दोन वेळेस निर्जंतुकीकरण केले सर्व यंत्रणा त्या ठिकाणी ठाण मांडून आहे.  महापालिकेचे आयुक्त रमेश पवार यांनी या वसाहतीस भेट देऊन संबंधित रुग्णाच्या नातेवाइकांशी संपर्क साधला व त्यांच्याकडून अनौपचारिक माहिती घेतली. 

कुटुंबातील पाच जण विलगीकरण कक्षात
संबंधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोधदेखील घेतला जात आहे. त्याच्या कुटुंबातील पाच लोकांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.  संबंधित रुग्ण हा परभणीचा नसून तो येथे राहणाऱ्या आपल्या नातेवाइकाकडे आला होता, अधिकची माहिती पोलिस प्रशासन घेत आहे, असे श्री. पवार म्हणाले. नागरिकांनी आपल्या आजूबाजूस बाहेरून आलेल्या व्यक्तीची प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन आयुक्त  रमेश पवार यांनी केले आहे.

संचारबंदीतून यांना मिळणार सूट
परभणीशहरासह शहराच्या तीन किलोमिटर अंतरावर ही संचारबंदी लागू राहणार आहे.  ता. १७ ते १९ एप्रिलच्या रात्री १२ वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू राहील. या संचारबंदीत सर्व शासकीय कार्यालये, त्यांचे कर्मचारी, त्यांची वाहने, सर्व शासकीय वाहने, सर्व शासकीय व खासगी दवाखाने, सर्व औषधी दुकाने, शासकीय निवारागृहे, कॅम्पमध्ये तसेच बेघर व गरजूंना अन्न वाटप करणाऱ्या सामाजिक संस्था व त्यांची वाहने, अत्यावश्यक सेवेसाठी परवाने घेतलेले वाहने व व्यक्ती, वैद्यकीय आपत्काल व अत्यावश्यक सेवा, शासकीय दूध संकलन व त्यांची वाहने, प्रसार माध्यमे, वृत्तपत्र विक्रेते व सबंधीतांना संचारबंदीतून सूट मिळणार आहे.

आरोग्य तपासणीसाठी १३ पथके तैनात
त्या परिसरातील सर्व घरांतील नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाणार असून त्यासाठी १३ पथके कार्यान्वित केल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त रमेश पवार यांनी दिली. बाधित रुग्ण आढळून आल्याचे स्पष्ट होताच महापालिकेत कार्यालय प्रमुखांची बैठक घेण्यात आली व  केल्या जाणाऱ्या उपाययोजनांबाबत सूचना देण्यात आल्या आल्या. या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी पालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना छोटेखानी प्रशिक्षणदेखील दिले असल्याची माहिती पवार यांनी दिली. दरम्यान, नागरिकांनी घाबरुन न जाता काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. 

एटीएम सेंटर रविवारपर्यंत बंद
 कोरोनाबाधित व्यक्ती परभणीत आढळून आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना अधिक कडक पद्धतीने राबविण्यास सुरवात केली आहे. ता. १७ ते १९ एप्रिल दरम्यान, परभणी शहरातील सर्व बँका व एटीएम सेंटर बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. सलग तीन दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर परभणी शहरातील व शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या सर्व राष्ट्रीयीकृत, खासगी, सहकारी व इतर वित्तीय संस्था तसेच एटीएम सेंटर बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सायंकाळी काढले आहेत.



कारवाइ करण्यात येईल
संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर कुणी घराबाहेर फिरतांना आढळून आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ नुसार शिक्षेस पात्र धरण्यात येईल.
- दीपक मुगळीकर, जिल्हाधिकारी, परभणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com