परभणी आगाराची लालपरी पुन्हा धावली

कैलास चव्हाण
सोमवार, 29 जून 2020

लॉकडाउनमध्ये अडीच महिने बससेवा बंद राहिली होती. त्यानंतर लॉकडाउन चारमध्ये शिथिलता मिळाल्याने ता. २१ मे रोजी जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर ता. २६ ते २८ मे दरम्यान, संचारबंदी लागू झाल्यानंतर एसटीची सेवा खंडित झाली होती. त्यानंतर मात्र सुरळीतपणे एसटी सेवा सुरू झाली आहे.

परभणी : परभणी आगाराने  संचारबंदी दरम्यान, बंद केलेली बससेवा रविवार (ता. २८) पासून पूर्ववत सुरू केली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, सोमवारी जिंतूर आणि सोनपेठ शहरात संचारबंदी लागू झाल्याने त्या दोन्ही शहरात जाणारी बससेवा बंद झाली आहे.

लॉकडाउनमध्ये अडीच महिने बससेवा बंद राहिली होती. त्यानंतर लॉकडाउन चारमध्ये शिथिलता मिळाल्याने ता. २१ मे रोजी जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर ता. २६ ते २८ मे दरम्यान, संचारबंदी लागू झाल्यानंतर एसटीची सेवा खंडित झाली होती. त्यानंतर मात्र सुरळीतपणे एसटी सेवा सुरू झाली आहे.

परभणी, जिंतूर, पाथरी आणि गंगाखेड आगारातून जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू झाली आहे. अद्याप खासगी वाहतुकीला परवानगी नसून जी वाहने धावत आहे त्या वाहनधारकांनी प्रवासाचे दर दुप्पट केल्याने प्रवासी एसटीला प्राधान्य देत आहेत. दरम्यान, ता. २५ ते २७ जून दरम्यान, परभणी शहरात संचारबंदी लागू केल्याने परभणी आगाराची बससेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे परभणी शहरात एकही बस येऊ शकली नाही आणि येथून बस गेली नाही. संचारबंदी उठताच रविवारी (ता. २८) पुन्हा परभणी आगाराच्या बस सुरू झाल्या आहेत. परभणी ते जिंतूर, परभणी ते गंगाखेड, परभणी ते सेलू, परभणी ते पाथरी, मानवत अशा रस्त्यावर बस धावत आहेत. तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातदेखील बससेवा सुरू झाली आहे.

हेही वाचा :​ परभणीत जिल्ह्यात रविवारी चार कोरोना पॉझिटिव्ह

 

बससेवा ठरली मोठा आधार
जिल्ह्यात बससेवा सुरू केल्याने ग्रामीण भागासह तालुक्यावरून परभणी शहरात येणाऱ्या प्रवाशांना सोयीचे ठरले आहे. सध्या खासगी वाहतूक बंद आहे. त्यामुळे अनेकांना वैयक्तिक वाहन करून शहरात येणे शक्य नाही. अशा स्थितीमध्ये कामानिमीत्त शहराच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी बससेवा मोठा आधार ठरत आहे.

सोमवारी जिंतूर, सोनपेठची बससेवा बंद
जिंतूर आणि सोनपेठ शहरात रविवारी कोरोनाचे रुग्ण अढळल्यानंतर सोमवारी दोन्ही शहरांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही शहरांतील बससेवा ताप्तुरत्या स्वरूपात खंडित करण्यात आली आहे. संचारबंदी उठताच बससेवा पूर्ववत होणार आहे.

हेही वाचा : टंचाईच्या कामांना मरगळ, ११६ पैकी सहा कामे पूर्ण -

मालवाहतुकीतून मिळाले उत्पन्न
लॉकडाउन दरम्यान, ता. नऊ जूनपासून एसटीने मालवाहतूक सुरू केली आहे. या योजनेला शेतकरी, व्यापाऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. विश्वास आणि सोयीची सेवा असल्याने अधिक पसंती देत मालवाहतुकीसाठी एसटीच्या सेवेचा वापर सुरू केला आहे. आतापर्यंत ३८ फेऱ्यांतून चार हजार ५२२ किलोमीटर अंतराची मालवाहतूक करण्यात आली आहे. त्यातून एसटीला एक लाख ७९ हजार ४५० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील आगारांचे हे उत्पन्न आहे. अकोला, वाशीम, पुसद, लातूर या जिल्ह्यांत मालाची वाहतूक करण्यात आली आहे. धान्य, पेंड, हळद, सरकी ढेप आदींची वाहतूक करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parbhani ST bus undone Parbhani News