esakal | परभणी : लसीकरणाची पुरवठ्याअभावी कासवगतीने वाटचाल
sakal

बोलून बातमी शोधा

लसीकरण

परभणी : लसीकरणाची पुरवठ्याअभावी कासवगतीने वाटचाल

sakal_logo
By
गणेश पांंडे

परभणी ः कोरोना विषाणु संसर्गावर संजिवनी (Covid Virus) ठरलेल्या कोविशिल्ड व कोव्हॅक्सीन या दोन कोरोना प्रतिबंधक लसीचे (vaccination) सध्या जिल्ह्यात लसीकरण सुरु आहे. मंगळवार (ता. ११) मेपर्यंत जिल्ह्यातील केवळ दोन लाख १७ हजार ८१४ लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यात ९९ हजार ५८२ पुरुष तर ८२ हजार २९१ स्त्रीयांचा समावेश आहे. जिल्ह्यात लसीकरणचा (Parbhani) वेग मंदावला असल्याने जिल्ह्यात लसीकरणासाठी मागणी प्रमाणे डोसेचा पुरवठा होणे गरजेचे आहे. परंतू तसे होत नसल्याने जिल्ह्यात यंत्रणा सक्षम व लोकांची मानसिकता असतांनाही लसीकरण वेग पकडत नसल्याचे दिसत आहे. (Parbhani: Vaccination is slow due to lack of supply)

परभणी जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी ५१ केंद्र तयार आहेत. त्यापैकी ५० शासकीय तर १ खासगी दवाखान्यातून लसीकरण केले जात आहे. या ५१ लसीकरण केंद्रावर पुरेश्या प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध आहे. लसीकरणा संदर्भात लोकांची मानसिकता देखील बदलेली आहे. त्यामुळे लसीकरण करून घेण्यासाठी लोकांची उडी पडतांना दिसत आहे. एकीकडे लसीकरण करून घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्या जास्त असताना दुसरीकडे लसीचा पुरवठा मात्र पाहिजे त्या प्रमाणात होतांना दिसत नाही. जिल्ह्यात मंगळवार, ता. ११ मे पर्यंत तब्बल २ लाख १७ हजार ८१४ नागरीकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यापैकी १ लाख ८१ हजार ८९४ जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर ३५ हजार ९२० जणांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. परंतू लसीचा पुरवठा पुरेश्या प्रमाणात होत नसल्याने आता ४४ वर्षाच्या खालील नागरीकांचे लसीकरण थांबविण्यात आले आहे. त्यामुळे केवळ ४५ वर्ष पूर्ण करणाऱ्या लोकांचेच सद्या लसीकरण सुरु आहे.

हेही वाचा - एअर इंडियाचे नांदेड- अमृतसर- दिल्ली विमानसेवा पुन्हा लॅन्ड; मात्र जुन महिन्याची बुकिंग सुरु

कोव्हिशिल्डचे डोसच जास्त

जिल्ह्यात झालेल्या २ लाख १७ हजार ८१४ नागरीकांपैकी तब्बल १ लाख ६८ हजार १७५ नागरीकांनी सिरम इन्स्टिट्युटच्या कोव्हिशिल्ड लसीचा पहिला किंवा दोन्ही डोस घेतले आहेत. तर भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसीचे ४९ हजार ६३९ जणांना लसीकरण करण्यात आले आहे.

लसीकरणात पुरुषाचा टक्का अधिक

जिल्ह्यात सध्या १ लाख ८१ हजार ८८४ लोकांनी पहिला डोस घेतला आहे. त्यात ९९ हजार ५८२ पुरुष नागरीकांनी स्वता पहिला डोस पूर्ण केला आहे. तर ८२ हजार २९१ स्त्रीयांनी दुसरा डोस पूर्ण केला आहे. २१ इतर नागरीकांचे पहिला डोस पूर्ण झाला आहे.

साठी पार केलेल्याची संख्या अधिक

परभणी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सुरुवातीस ६० वर्ष पूर्ण करणाऱ्या लोकांचे लसीकरण करण्यात आले. त्यात आता पर्यंत ७४ हजार ७९३ जणांचे लसीकरण झाले आहे. ४५ ते ६० वर्ष वयोगटातील ७० हजार २९६, ३० ते ४५ वर्ष वयोगटातील २४ हजार ९७० तर १८ ते ३० वर्ष वयोगटातील ११ हजार ८२५ जणांचे लसीकरण झाले आहे.

सध्या ४५ वर्षाच्यावरील लोकांना लसीकरण करण्यात यावे असे निर्दश आहेत. त्या नुसार जिल्ह्याला आता साडेसहा लाख डोसेचे आवश्यकता आहे.आम्ही सातत्याने मागणी नोंदवित आहोत. आमची यंत्रणा पूर्णपणे सक्षम आहे. परंतू लसीचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नाही. त्यामुळे लसीकरणात सातत्य राहत नाही. गुरुवारी (ता.१३) कोव्हिशिल्डचे ६ हजार डोस जिल्ह्यात प्राप्त होतील.

- डॉ. रावजी सोनवणे, जिल्हा लसीकरण अधिकारी,परभणी

- ९९ हजार ५८२ पुरुष तर ८२ हजार २९१ स्त्रीयांचे लसीकरण

- १८ ते ४५ वयोगाटातील ३६ हजार ७९५ जणांचे लसीकरण

- गुरुवारी कोव्हिशिल्डचे ६ हजार डोस मिळणार

- मागणी प्रमाणे पुरवठा होत नसल्याने लसीकरणात अडथळे

- जिल्ह्यासमोर सध्या साडेसहा लाख लसीकरणाचे उदिष्ट

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image
go to top