परभणीची महिला कुटुंबासह मातोश्रीवर उपोषण करणार; काय आहे कारण ? 

गणेश पांडे
Monday, 18 January 2021

खासदार बंडू जाधवच्या विरोधात ‘त्या’जमीन विक्रीविषयी खासदारांनी आम्हाला अंधारात ठेवले. सारिका काळे यांचा आरोप ; वडिलांच्या विरोधात न्यायालयात याचिका

परभणी ः एरंडेश्वर (ता. पूर्णा) येथील शेत जमिन खरेदी- विक्री प्रकरणी आम्हाला खासदार संजय जाधव यांनी पूर्णपणे अंधारात ठेवून आमचा विश्वासघात केल्याचा आरोप काळे कुटुंबातील सारिका कदम यांनी रविवारी (ता. १७) पत्रकार परिषदेत केला. एवढेच नाही तर लवकरच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी कुटुंबियांसह उपोषणाला बसणार असल्याचे सारिका कदम यांनी सांगितले. त्यामुळे परभणीत एकच खळबळ उडाली.

एरंडेश्वर (ता. पूर्णा) येथील तीन एकर ३५ गुंठे शेतजमीन रामप्रसाद काळे यांच्याकडून खासदार संजय जाधव यांनी त्यांच्या पत्नीच्या नावाने ४४ लाख ५३ हजारांना खरेदी केली. या खरेदीसाठी धनादेशाद्वारे रक्कम रामप्रसाद काळे यांच्या बॅंक खात्यावर पाठविण्यात आल्याचे खासदार संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. परंतू, या खरेदीच्या व्यवहारामध्ये आम्हाला पूर्णपणे अंधारात ठेवण्यात आल्याचे सारिका कदम यांनी सांगितले. जमीन खरेदी- विक्री व्यवहार होत असताना आमचे हक्कसोड पत्र देखील घेतलेले नाही. आम्ही दोन बहिणी व मयत भावाची दोन मुले हे वारस ठरतो. परंतू, या व्यवहारात असे झालेलेच नाही. 

हेही वाचाकोरोना पार्श्वभूमीवर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार मास्क वापरणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याने दम्याच्या रुग्णांमध्ये घट

आमचे वडील रामप्रसाद काळे हे आधीच मुलाच्या अकाली मृत्युमुळे खचले होते. त्यात त्यांच्यावर दबाव टाकून शेत जमीन खासदार संजय जाधव यांनी हडपल्याचा गंभीर आरोप सारिका कदम यांनी या वेळी केला. जमीन हस्तांतरीत करताना तलाठी आर. व्ही. कवठेकर यांनी दिलेल्या प्रमाणपत्रात जमीन कोरडवाहू असल्याचे सांगितले आहे. परंतू, या जमिनीत विहिरी, दोन बोअर व दहा सागाची झाडे आहेत. यावरुनही तलाठी श्री. कवठेकर यांनी बनावट प्रमाणपत्र दिल्याचा आरोपही सारिका कदम यांनी केला. या पत्रकार परिदेश रामप्रसाद काळे यांच्या पत्नी प्रेमाताई काळे, मुलगी सारिका कदम, शीतल धाबेकर, स्नुषा वर्षा काळे, व्यंकटेश काळे व सुभाष देशमुख पेडगावकर यांची उपस्थिती होती.

वडिलांच्या विरोधात न्यायालयात याचिका

हिंदू कायद्याप्रमाणे वडीलोपार्जित शेतीमध्ये मुलींचा ही तेव्हढाच हक्क असतो. आमची संमती न घेता आमचे वडील रामप्रसाद काळे यांनी जमिनीची विक्री केली आहे. ती पूर्णपणे चुकीची असल्यामुळे आम्ही न्यायालयात वडिलांविरोधात याचिका दाखल केल्याचे ही सारिका कदम यांनी सांगितले.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parbhani woman to fast on Matoshri with family parbhani news