esakal | Marathwada: नवरात्रीत झेंडू गडगडला, दसऱ्याची चिंता
sakal

बोलून बातमी शोधा

झेंडू

परभणी : नवरात्रीत झेंडू गडगडला, दसऱ्याची चिंता

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

देवगावफाटा : लॉकडाऊननंतर फुलशेतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळेच बाजारातही फुलांची आवक वाढली असून झेंडूला १० ते २० रुपये प्रतिकिलोचा भाव मिळत आहे. त्यामुळे दसऱ्याकडे डोळे लावून थांबलेल्या देवगावफाटा (ता. सेलू) परिसरातील फूल उत्पादकांना नवरात्रीत फुलांचे दर गडगडल्याने चिंता सतावू लागली आहे.

देवगावफाटा परिसरात अनेक गावातील शेतकरी पारंपरिक पिकाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे नगदी उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून भाजीपाला व फुलशेतीसह इतर पिकांकडे वळले आहेत. गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने विहिरी, तलाव, बोअर यात पाण्याची उपलब्धताही चांगली असल्याने अनेक शेतकऱ्यांनी गुलाब, मोगरा, गलांडाची लागवड तर केलीच जोडीला झेंडू फुलांचेही मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेतले आहे. त्यामुळे परिसरात झेंडू फुलांची शेती चांगलीच बहरली आहे.

हेही वाचा: औरंगाबादेत बंधाऱ्यात कार बुडाली,एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

मात्र गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सवावर मर्यादा, बंधने घालण्यात आल्यामुळे अतिवृष्टीत मोठी कसरत करून बागा जमवलेल्या शेतकऱ्यांच्या फुलांना अखेर पाहीजे त्या प्रमाणात मागणी नाही. परिणामी झेंडू १० ते २० रूपये किलो दराने विकला जात आहे.

उत्पादन, खर्चाचा ताळमेळ बसेना

सध्या पावसाच्या सरी अधूनमधून सुरूच राहत असल्याने फुले भिजून खराब होत आहेत. जमीन, मशागत, बियाणे, लागवड, पाणी देणे व तोडण्यासाठी साधारणपणे प्रतिमजूर २०० ते ३०० रूपये मजुरी देणे आणि अशात आता फुलांचे दर घसरल्यामुळे तर उत्पादन अन् खर्चाचा ताळमेळच बसेना अशी स्थिती निर्माण झाली आहे.

पारंपरिक शेतीपेक्षा फुलांची शेती चांगली म्हणून फुलांची बाग केली. मात्र सध्या ऐन नवरात्रोत्सवात झेंडूचे भाव उतरले असल्यामुळे मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

- अनंता दादाराव मोरे, झेंडू उत्पादक शेतकरी

loading image
go to top