लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी परभणीकर सज्ज 

गणेश पांडे 
Friday, 21 August 2020

परभणी शहरात श्रींच्या प्रतिष्ठापणेसाठी लागणाऱ्या विविध साहित्याची दुकाने सजली आहेत. यंदा मोठ्या गणेशमुर्त्यांना बंदी असल्याने छोट्या परंतू आकर्षक मुर्त्या बाजारात आल्या आहेत. प्रशासनाने यासाठी तयारी पूर्ण केली आहे.

परभणी ः परभणी शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरु आहे. सार्जनिक मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. बाप्पांच्या स्वागतासाठी सजावटीच्या वस्तू आणि पुजेच्या साहित्याने बाजारपेठ सजली आहे. गणेशोत्सव निर्विघ्नपणे व उत्साहात पार पाडण्यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. 

दरवर्षी मोठ्या जल्लोषात बाप्पांचा आगमन सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. अनेक ठिकाणी सार्वजनिक मंडळांच्या आगमन सोहळ्याला लाखो भाविकांची गर्दी होते. मात्र, यंदा कोरोना संकटामुळे या सगळ्यावर बंधन आली आहेत. त्यामुळे अगदी साधेपणाने हा उत्सव आपल्याला साजरा करावा लागत आहे. मात्र, असं असलं तरी गणेश भक्तांचा उत्साह अजिबात कमी झालेला दिसत नाही. 
सार्वजनिक गणेशोत्सवाला शनिवार (ता.२२) पासून सुरुवात होत आहे. 

हेही वाचा - परभणी जिल्ह्यात संतधार पावसाचा पिकांना फटका, शेतकरी पुन्हा संकटात

आकर्षक मखर उपलब्ध
यंदा गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असले तरी बाजारपेठेत आरास सजावटीला लागणारी चमकी, माळा, इतर साहित्य आकर्षक मखर उपलब्ध झाले आहेत. मखरासाठी फायबर आणि कार्डबोर्डचे साहित्य खरेदी करण्यासाठी गणेशभक्तांची लगबग दिसत होती. घरगुती गणेश मुर्तीची प्रतिष्ठापणा करण्यासाठी मखराची मागणी वाढली आहे. थर्माकोलवर बंदी असल्याने यंदा कापडी, कागदी मखरे बाजारात दाखल झाली आहेत. पर्यावरणस्नेही मखर फोल्डेबल असल्याने त्यांचा दीर्घकाळ वापर करता येणार आहे. मोत्यांचे कापडी तोरण, वॉल हॅगिंग, कृत्रिम फुले यांचीही ग्राहक खऱेदी करीत आहेत. गणपतीपाठोपाठ गौरींचे आगमन होत असल्याने गौरीच्या साजश्रृंगाराच्या साहित्याचीही बाजारात रेलचेल आहे. त्यात रेडिमेड साड्या, दागिने, गजरे, वेण्या, खण, मुखवटे आदी बाजारपेठेत मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्या शिवाय सजावटीसाठी लायटिंगच्या माळा, फोकस लाईट यांच्या खरेदीवरही भर दिला जात आहे. 

हेही वाचा - हिंगोलीने मिळविला देशभरात मान, पंतप्रधानांच्या हस्ते पुरस्कार वितरण

श्रींचे आगमन निश्चितच कोरोनाचे हे विघ्न दुर करेल 
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परभणी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मी शुभेच्छा देतो. हा उत्सव आनंदाचा व उत्साहाचा आहे. परंतू, यंदा आलेल्या कोरोना विषाणु संसर्गामुळे आपल्याला सोशल डिस्टसिंगचे तंतोतत पालन करून हा उत्सव साजरा करावा लागणार आहे. श्रींचे आगमन निश्चितच कोरोनाचे हे विघ्न दुर करेल असा मला विश्वास आहे. - दीपक मुगळीकर, जिल्हाधिकारी, परभणी. 

कुणीही रस्त्यावर गर्दी करू नये
कोरोना विषाणु संसर्गामुळे कुणीही रस्त्यावर गर्दी करू नये. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. हा उत्सव आनंदात साजरा व्हावा यासाठी पोलिस प्रशासन संपूर्ण तयारी निशी सज्ज आहे. परंतू नागरीकांनी सोशल डिस्टसींगचे पूर्णपणे पालन करावे. - कृष्णकांत उपाध्याय, पोलिस अधिक्षक, परभणी. 

नागरिकांनी काळजी घ्यावी
कोरोना संसर्गाचा शहरात प्रसार वाढत असल्याने त्या संदर्भात नागरिकांनी काळजी घ्यावी. रस्त्यावर एकत्र जमू नये. स्वच्छतेसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. हा गणेशोत्सव निश्चित शहरावर आलेले संकट दुर करून आपण परत एकदा पूर्णपणे मुक्त होऊ. सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा. - देविदास पवार, आयुक्त, महापालिका, परभणी 

 

संपादन ः राजन मंगरुळकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parbhanikar ready to welcome dear Bappa, Parbhani News